Arun Godbole Passes Away: अरुणकाकांच्या निधनाने किमयागार हरपला !, सातारकरांनी व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 15:19 IST2025-10-15T15:18:54+5:302025-10-15T15:19:34+5:30
Arun Godbole Death: कविता, प्रवासवर्णन, ललित, संतसाहित्य अशा विविध प्रकारचे साहित्यलेखन त्यांनी केले

Arun Godbole Passes Away: अरुणकाकांच्या निधनाने किमयागार हरपला !, सातारकरांनी व्यक्त केल्या भावना
सातारा : येथील ज्येष्ठ करसल्लागार, चित्रपट निर्माते अरुण रामकृष्ण गोडबोले (वय ८२) यांचे मंगळवारी निधन झाले. अरुण गोडबोले यांचे साहित्य, संस्कृती, चित्रपट यांसह विविध क्षेत्रांत कार्य होते. त्यांच्या निधनानंतर ‘साताऱ्यातील किमयागार, मार्गदर्शक हरपला आहे,’ अशा भावना सातारकरांतून व्यक्त होत आहेत.
येथील दि युनायटेड वेस्टर्न बँक, आयुर्वेदीय अर्कशाळा, सज्जनगडचे समर्थ सेवा मंडळ, अंत्यसंस्कार सहायक मंडळ अशा अनेक संस्थांमधून त्यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळली होती. चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांनी ठसा उमटविला होता. कविता, प्रवासवर्णन, ललित, संतसाहित्य अशा विविध प्रकारचे साहित्यलेखन त्यांनी केले. कौशिक प्रकाशन संस्थेमार्फत त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली होती. सामाजिक बांधीलकीच्या नात्यातून सुरू करण्यात आलेल्या रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टचा वटवृक्ष करण्यामध्ये त्यांचे विशेष योगदान होते.
वाचा- ज्येष्ठ साहित्यिक अरुण गोडबोले यांचे निधन
स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत त्यांनी केलेला वार्तालाप, चर्चा, मुलाखती, पंडित प्रभाकर कारेकर यांना तब्बल ३५ वर्षे एकाच दिवशी, एकाच ठिकाणी गायला लावलेली संगीतमैफल, संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज संगीतकारांना एकत्र आणून सादर केलेले विविध कार्यक्रम, समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध आणि मनाच्या श्लोकांवर केलेले विशेष निरूपणही अनेकांना भावत होते.
साताऱ्यातील प्रख्यात करसल्लागार, लेखक, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व असणारे अरुण गोडबोले यांच्या निधनाने आर्थिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे ज्ञान, विनम्रता आणि कार्यतत्परता नेहमीच स्मरणात राहील. - उदयनराजे भोसले, खासदार
साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिक, करसल्लागार आणि चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांच्या निधनाने एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. मितभाषी, मनमिळाऊ, शांत, संयमी आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे अरुणकाका यांनी साताऱ्याच्या नावलाैकिकात निश्चितच भर पाडली आहे. एक निर्मळ मनाचा मार्गदर्शक हरपला आहे.- शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री, सार्वजनिक बांधकाम
अष्टावधानी आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या अरुणकाकांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, तिथे आपली वेगळी छाप निर्माण केली. त्यांच्या कार्यात बुद्धिमत्तेची चमक आणि माणुसकीचा गहिवर जाणवायचा. सातारकरांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केलं. किमयागार माणूस आपल्यातून दूर गेला असून त्यांची उणीव भरून निघणं कठीण आहे. - माजी प्राचार्य डाॅ. यशवंत पाटणे.