सातारा पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’!, निवडणुकीत ‘भाजप’ला बंडखोरीचा धोका
By सचिन काकडे | Updated: November 12, 2025 17:16 IST2025-11-12T17:13:29+5:302025-11-12T17:16:20+5:30
Local Body Election: अनेक उमेदवारांच्या पुढे दुहेरी संकट

सातारा पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’!, निवडणुकीत ‘भाजप’ला बंडखोरीचा धोका
सचिन काकडे
सातारा : साताऱ्याच्या राजकारणात ‘मनोमिलन’ यशस्वी झाले असले तरी, आगामी पालिका निवडणुकीत भाजपसमोर ‘बंडखोरी’ चे मोठे संकट उभे ठाकले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एकत्र येण्यानंतर पालिकेच्या ५० जागांसाठी तब्बल ५०० हून अधिक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केल्याने, भाजपपुढे उमेदवार निवडीचा मोठा पेच आहे. या बंडखोरीमुळे पालिकेत ‘राजे’ विरुद्ध ‘शिलेदार’ असा सामना रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सोमवारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी रीतसर मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, रात्री उशिरा उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन ‘गुफ्तगू’ केले.
यानंतर आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही दोन्ही राजे उपस्थित होते. या बैठकीत ‘कोणत्या शिलेदाराला लॉटरी’ आणि ‘कोणाला बाजूला ठेवायचे’ यावर विचारमंथन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारांची संख्यापाहता भाजपला गमिनी काव्याने उमेदवारांची निवड करावी लागणार असल्याने कोणाला लॉटरी लागणार आणि कोणाला नाही? यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.
अनेक उमेदवारांच्या पुढे दुहेरी संकट
दोन राजेंच्या जुन्या-नव्या निष्ठावंतांनी गेल्या चार वर्षांत प्रभागात ‘स्वतंत्र व्होट बँक’ तयार केली आहे. क्षमता असूनही जर उमेदवारी नाकारली गेली तर हे नाराज शिलेदार शांत बसणार नाहीत. ते थेट महाविकास आघाडीच्या छावणीत प्रवेश करून राजेंच्या विरोधात ‘राजकीय ताकद’ दाखवू शकता. महाविकास आघाडीने देखील गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, नाराज बंडखोर उमेदवार महाविकास आघाडीची ताकद ठरू शकतात.
जागा वाटपाचा फॉर्म्युला...
सातारा पालिकेची निवडणूक सातारा विकास आणि नगर विकास आघाड्यांमार्फत होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे दोन आघाड्या, मूळ भाजप आणि शिंदे सेना यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा जुळवायचा, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. येत्या दोन-तीन दिवसांत राजकीय समीकरणे बदलणार असून, बंडखोरीचे हे वादळ साताऱ्यात कोणाला धक्का देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.