साताऱ्यात राजकीय जुगलबंदी; आम्हाला पण दाढी हाय, नादाला लागायचं नाय; जयकुमार गोरेंची शिंदेसेनेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:45 IST2025-12-27T13:43:01+5:302025-12-27T13:45:21+5:30
रामराजे यांना पुन्हा एकदा ‘शकुनी मामा’ म्हणत खोचक टीका

साताऱ्यात राजकीय जुगलबंदी; आम्हाला पण दाढी हाय, नादाला लागायचं नाय; जयकुमार गोरेंची शिंदेसेनेवर टीका
सातारा : सातारा जिल्ह्यातील महायुतीतील पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ग्रामविकासमंत्री यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच रंगले आहे. फलटणला भाजपच्या विजयी उमेदवारांच्या आभार मेळाव्यात मंत्री गोरे यांनी रामराजे आणि शिंदेसेनेवर टीका केली. आम्हाला पण दाढी आहे, असे सांगत आमच्या नादाला लागायचे नाय, असा इशारा दिला होता. याला पालकमंत्री देसाई यांनी मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही, असा इशारा देत जशास तसेच उत्तर दिले.
सातारा जिल्ह्यात बहुतांशी नगरपालिका निवडणुकीत महायुती झालीच नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप स्वतंत्रच लढली. त्यावेळीही महायुती अंतर्गत एकमेकांवर टीका करण्यात आली. आता निकालानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले आहेत. याचेच पडसाद फलटणमधील भाजपच्या विजयी उमेदवारांच्या मेळाव्यात गुरुवारी उमटले.
‘शकुनी मामा’ म्हणत खोचक टीका...
मंत्री जयकुमार गोरे यांनी टीका केली. मंत्री गोरे यांनी रामराजे यांना पुन्हा एकदा ‘शकुनी मामा’ म्हणत खोचक टीका केली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात शिंदेसेनेवरही टीका केली. ‘दाढीवर हात फिरवत कोणीतरी या ठिकाणी आलं आणि इथे दहशत चालत नाही,’ असे बोलले होते. त्यांना मला सांगायचे आहे. याआधीही कोरेगावचे आले, उत्तरचे आले आणि आता फलटणचे. पण, दहशत आम्हाला चालत नाही आणि आम्हाला, पण दाढी आहे, असे सांगत आमच्या नादाला लागायचे नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दहशतीच्या भाषेस जशास तसे उत्तर...
मंत्री गोरे यांनी फलटण येथील मेळाव्यात दिलेल्या इशाऱ्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही त्यांना जोरदार उत्तर दिले. “माझा नाद करायचा नाही, असं जयकुमार गोरे म्हणतायत, याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही. तसेच जिल्हा दहशत कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केली, तर त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल,” अशा शब्दांत मंत्री देसाई यांनी गोरे यांना उत्तर दिलं आहे.