काश्मीरनंतर महाबळेश्वरमध्ये होणार केशर उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 02:40 IST2020-11-24T02:39:13+5:302020-11-24T02:40:16+5:30
समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवर सरासरी दहा डिग्री तापमानामध्ये हे पीक घेतले जाते. कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते

काश्मीरनंतर महाबळेश्वरमध्ये होणार केशर उत्पादन
दिलीप पाडळे
पाचगणी (सातारा) : ‘स्ट्रॉबेरी हब’ असलेल्या महाबळेश्वरमध्ये केशर लागवडीचा प्रयोग करण्यात येत आहे. थंड वातावरण, केशर लागवड योग्य जमीन असल्याने कृषी विभागाने प्रोत्साहन दिल्याने क्षेत्र महाबळेश्वर येथील प्रयोगशील शेतकरी गणेश जांभळे, मेटगुताड येथील दीपक व अशोक बावडेकर यांनी आपल्या क्षेत्रामध्ये केशरची लागवड केली आहे.
समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवर सरासरी दहा डिग्री तापमानामध्ये हे पीक घेतले जाते. कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते. पंधरा ते पंचवीस सेंटीमीटर असे फूलझाड वाढत असते. यातील गवतापासून निमुळती होत जाणारी पाने येतात. फुले जांभळट रंगाची असतात. याच्यात पिवळसर कोश तयार होतो. त्यालाच ‘केशर’ असे म्हणतात. केशरची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये केली जाते. डिसेंबर-जानेवारीत फुले येतात. ती खुडून उन्हात वाळवून त्यापासून केशर मिळवतात.
महाबळेश्वरला केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीबरोबरच केशरचे भक्कम उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. येथील स्ट्रॉबेरी जशी जगप्रसिद्ध आहे तसेच केशरही जगप्रसिद्ध होईल.
- दीपक बोर्डे, कृषी सहायक
हिमालयन केशर
nजगभरात केशराच्या हिमालयन, अमेरिकन, अफगाण व चायना अशा जाती आहेत. हिमालयन केशर म्हणजे काश्मिरी केशर. ते सर्वोत्कृष्ट मानले जाते. या केशरचा भाव सरासरी साडेतीन लाख रुपये किलो असतो.
nजगामध्ये स्पेन, इराक, फ्रान्स, इटली, तुर्की, चीन येथे केशरचे पीक घेतले जाते. तर काश्मीरमध्ये पंपोरे व किश्तवाड येथे पिकवले जाते.