टपाल कार्यालयात नोकरीसाठी जोडले दहावीचे बनावट प्रमाणपत्र, ..अन् असे फुटले बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:17 IST2023-03-28T13:16:53+5:302023-03-28T13:17:05+5:30
'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी निवड झाली, सातार्यातील डाक विभागामध्ये आला. अन्...

टपाल कार्यालयात नोकरीसाठी जोडले दहावीचे बनावट प्रमाणपत्र, ..अन् असे फुटले बिंग
सातारा : 'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी एकाने दहावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून हे प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड केले. हा प्रकार डाक विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित उमेदवारावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
शिवाजी नवनाथ गंडमळे (रा. मांजरी, पो.सुगाव (कॅम्प), ता. मुखेड मांजरी, जि. नांदेड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या वर्षी भारतीय डाक विभागाकडून 'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरातून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. अर्जासोबत शैक्षणिक कागपत्रे अपलोड करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया मे २०२२ पासून सुरू होती. या भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असताना संशयित शिवाजी गंडमळे याचे दहावीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले.
तो दहावी उत्तीर्ण आहे. मात्र कमी मार्कस् असल्यामुळे त्याने बनावट मार्कस् दाखवून प्रमाणपत्र तयार केले. हे प्रमाणपत्र त्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचे सेंकडरी स्कूल २०१६ चे प्रमाणपत्र ऑनलाइन अपलोड केले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे त्याची या पदासाठी निवडही झाली होती.
या पदासाठी तो पात्र झाल्यानंतर तो स्वत: सातार्यातील डाक विभागामध्ये आला. त्याने पुन्हा हे बोगस प्रमाणपत्र आणून दिले होते. त्याची पुन्हा तपासणी अधिकाऱ्यांनी केली. त्यावेळी खरोखरच ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर डाक विभागातील अधिकारी संदीप सोपानराव घोडके (वय ४०, रा. सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास हवालदार राहुल दळवी हे करीत आहेत.
असे फुटले बिंग...
'ग्रामीण डाक सेवक' या पदासाठी ज्या जागेवर उमेदवार नियुक्त करायचे असतात. त्या जागेसाठी जे अर्ज येतील त्या अर्जाची छाननी करून दहावीमध्ये ज्याला जास्त मार्कस् असतात. अशा पात्र उमेदवाराची ऑनलाइन पोर्टलनुसार नियुक्ती होते. व त्यानंतर त्याच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाते. याच पडताळणीमध्ये संशयित शिवाजी गंडमळेचे बिंग फुटले.