मंत्री जयकुमार गोरेंकडे एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, कसा रचला सापळा.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:09 IST2025-03-22T13:08:09+5:302025-03-22T13:09:15+5:30
सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस १ कोटी रुपयांची रोकड स्वीकारताना रंगेहाथ ...

मंत्री जयकुमार गोरेंकडे एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, कसा रचला सापळा.. वाचा
सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस १ कोटी रुपयांची रोकड स्वीकारताना रंगेहाथ पकडले. स्थानिक गुन्हे शाखेने महिलेच्या वकिलाच्या सातारा येथील कार्यालयात शुक्रवारी पंचांसमक्ष ही कारवाई केली. यानंतर तिला अटक करून सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर संबंधित महिलेने आक्षेपार्ह फोटो पाठविल्याचा आराेप केला होता. यामुळे अधिवेशनावेळी मोठी खळबळ उडाली होती. यानंतर हा वाद मिटविण्यासाठी संशयित महिला तीन कोटी रुपयांची मागणी गोरे यांच्याकडे करत होती. महिलेने आपल्या वकिलामार्फत मंत्री गोरे यांचे मित्र विराज शिंदे (रा. वाई) यांच्याकडे ही मागणी केली होती. त्यानंतर मंत्री गोरे यांनी याविरोधात लेखी तक्रार दिली होती.
तक्रारीची शहानिशा करून पुढील कारवाईसाठी तक्रारदार विराज शिंदे हे दि. १७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेत आले होते. यावेळी विराज शिंदे यांनी पोलिसांना सांगितले की, संशयित महिला दि. १७ रोजी राजभवन येथे उपोषणाला न बसण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे ३ कोटी खंडणीची मागणी वकिलामार्फत करत आहे. रक्कम न दिल्यास गोरे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करत बदनामी करून मंत्रिपद घालवणार आहे. ते एका अपघातातून बचावले आहेत, आता जिवंत राहणार नाहीत, अशी धमकी दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तक्रारीची खात्री करण्याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून व्हाइस रेकॉर्डर प्राप्त करून घेतला. दोन शासकीय पंचांसह दि. १७ व दि. १९ रोजी तक्रारदार व संबंधित महिला व वकिलाशी चर्चा झाली. तक्रारदार महिला ३ कोटी दोन टप्प्यांत रोख मागत असल्याचे व्हाइस रेकॉर्डवरील संभाषणावरून निष्पन्न झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून महिलेस रंगेहाथ पकडले. तिच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, तिला अटक केली आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व पथकाने ही कारवाई केली.
असा रचला सापळा
- तक्रारदार असलेले विराज शिंदे व मंत्री गोरे खंडणीची रक्कम जास्त व रोख देण्याची असल्याने मित्रांकडून गोळा करण्याकरिता दोन दिवसांचा वेळ मागितला.
- दि. २१ रोजी तक्रारदारांनी १ कोटी रोख स्वरूपात जुळवाजुळव करून सातारा स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आले.
- संबंधित महिलेच्या वकिलांनी तक्रारदार रोकड घेऊन येत असल्याचे सांगितले असता, महिलेने रक्कम वकिलाच्या ऑफिसमध्ये घेऊन येण्यास सांगितले.
- संबंधित महिला त्या ठिकाणी आली. तक्रारदारांनी शासकीय पंचांसमक्ष वकिलाच्या ऑफिसमध्ये संबंधित महिलेने १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताच पोलिस पथकाने रंगेहाथ पकडले.
काय आहे प्रकरण?
मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेस आक्षेपार्ह फोटो पाठविल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. यावरून विरोधकांनीही मंत्री गोरे आणि राज्य सरकारला धारेवर धरत राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, जयकुमार गोरे यांनी हे जुने प्रकरण असून, कोर्टाने आपल्याला निर्दोष मुक्त केल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले होते.
आणखी एक संशयित ताब्यात
याप्रकरणी शिंदेसेनेचे पदाधिकारी अनिल सुभेदार या आणखी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.