ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक, पुसेसावळीतील युवक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 15:11 IST2022-02-17T15:10:35+5:302022-02-17T15:11:29+5:30
पुसेसावळी : कडेगाव तालुक्यातील नेवरीजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची ...

ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक, पुसेसावळीतील युवक जागीच ठार
पुसेसावळी : कडेगाव तालुक्यातील नेवरीजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची घटना घडली. वैभव गुरव (वय २५, रा. पुसेसावळी, ता. खटाव) असे या मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, विटा (ता. खानापूर) येथील सुळेवाडी पाटबंधारे विभागात कार्यरत असलेले वैभव गुरव हे दुचाकीवरून आपले काम संपून घरी निघाले होते. दरम्यान नेवरी (ता. कडेगाव) येथील एसटी थांब्याजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला त्यांची पाठीमागून जोराची धडक झाली.
ही धडक इतकी जोराची होती की, गुरव याच्या डोक्याला मार लागल्याने त्याच्या कानातून व तोंडून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉली चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या अपघाताची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.