निसर्गाची किमया; साताऱ्यात दुर्मीळ ‘श्वेत शाही बुलबुल’चे दर्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:01 IST2025-08-08T16:01:01+5:302025-08-08T16:01:52+5:30
निसर्गप्रेमींसाठी हा बुलबुल कुतूहलाचा विषय ठरला

निसर्गाची किमया; साताऱ्यात दुर्मीळ ‘श्वेत शाही बुलबुल’चे दर्शन!
सातारा : समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात एका दुर्मीळ, संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या शाही बुलबुलची नोंद करण्यात आली आहे. पक्षी अभ्यासक सागर कुलकर्णी आणि आकाश राऊत यांनी या बुलबुलची नोंद केली असून, निसर्गप्रेमींसाठी हा बुलबुल कुतूहलाचा विषय ठरला आहे.
हा पक्षी त्याच्या सामान्य लाल आणि काळ्या रंगाच्या थव्यामध्ये आपले वेगळेपण मिरवत आहे. तो पांढरा असण्याचे कारण म्हणजे त्याच्या शरीरात ‘ल्यूसिजम’ नावाच्या स्थितीत बदल होणे. सामान्यतः पक्ष्यांच्या त्वचेमध्ये आणि पिसांमध्ये मेलेनिन नावाचे रंगद्रव्य असते, ज्यामुळे त्यांना त्यांचा विशिष्ट रंग मिळतो. मात्र, जनुकांमधील बिघाडामुळे जेव्हा या रंगद्रव्याची निर्मिती थांबते, तेव्हा पक्ष्याची पिसे संपूर्णपणे पांढरी होतात. हा बुलबुल त्याच स्थितीचे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या पंखांचा प्रत्येक भाग शुभ्र पांढरा आहे.
सातारा जिल्हा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा, घनदाट जंगल आणि वनसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. इथला पोषक अधिवास अनेक दुर्मीळ आणि विविध प्रजातींच्या पशुपक्ष्यांसाठी नंदनवन ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून अभ्यासकांनी या परिसरात अनेक दुर्मीळ नोंदी केल्या आहेत, ज्यामुळे साताऱ्याचे पर्यावरणीय महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
ही पहिलीच घटना
सातारा जिल्ह्यात आजवर अनेक दुर्मीळ पशू-पक्ष्यांची नोंद झाली आहे. मात्र, पांढऱ्या रंगाचा ‘श्वेत शाही बुलबुल’ आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नोंदीमुळे साताऱ्याच्या निसर्गातील अमूल्य ठेवा किती मोठा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. साताऱ्यातील पक्षी अभ्यासकांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळेच या पक्षाचे दुर्मीळ दर्शन घडले आहे.
सातारा जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा लाभली असून येथे अनेक पशुपक्षी अधिवास करतात. निरीक्षणावेळी प्रथमच पांढऱ्या रंगाचा श्वेत शाही बुलबुल आढळून आला. साताऱ्याच्या दृष्टीने ही अत्यंत दुर्मिळ अशी घटना म्हणावी लागेल. - सागर कुलकर्णी, पक्षी अभ्यासक