महामार्गावर मृतदेह पाहताच चालकाने लेन बदलली, खासगी लक्झरी बस कंटेनरवर आदळली; दोघे जखमी
By प्रशांत कोळी | Updated: September 7, 2022 18:02 IST2022-09-07T17:50:21+5:302022-09-07T18:02:25+5:30
बसचालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळविल्याने जीवित हानी टळली

महामार्गावर मृतदेह पाहताच चालकाने लेन बदलली, खासगी लक्झरी बस कंटेनरवर आदळली; दोघे जखमी
खंडाळा : पुणे-बंगळुरू महामार्गावर पारगाव गावचे हद्दीत कंटेनरने अचानक लेन बदलल्याने पाठीमागून रत्नागिरीहून पुण्याकडे जाणारी खासगी लक्झरी बस आदळली. त्यात बसमधील दोन जण किरकोळ जखमी झाले. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्याकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास काळ भैरवनाथ मंदिराजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने निनाद लांडे (वय ४३, रा. डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली) हा पादचारी जागीच ठार झाला. हा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडला होता.
यावेळी पुणे बाजूकडे जाणारी वाहने उजव्या बाजूने जात होती. अचानक पुढे मधील लेनमध्ये पडलेला मृतदेह पाहताच कंटेनर (जीजे १५-वायवाय ९११९) च्या चालकाने आपले वाहन उजव्या बाजूला घेतले. यावेळी कंटेनरचा वेग मंदावल्याने तिसऱ्या लेनमधून पाठीमागून येणारी खासगी बस (एमएच ११-सीएच ४७७६) ही कंटेनरवर आदळली. यावेळी बसचालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळविल्याने जीवित हानी टळली. मात्र, दुभाजकावर बस धडकल्याने बसचे नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले. रस्त्यातील मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी पाठविला. तर जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. या अपघाताची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.