कर्ज वसुलीसाठी क्रूरतेचा कळस : आईच्या कुशीतून दीड महिन्याचे लेकरू सावकारानं ओढून नेलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 20:03 IST2022-01-21T19:39:32+5:302022-01-21T20:03:36+5:30
एका वर्षात चौपटीने व्याज वसूल करून देखील आणखीन रकमेची मागणी

कर्ज वसुलीसाठी क्रूरतेचा कळस : आईच्या कुशीतून दीड महिन्याचे लेकरू सावकारानं ओढून नेलं
सातारा : अवघे तीस हजार रुपये कर्ज देऊन व्याजासह झालेल्या रकमेच्या परताव्यासाठी सदर बाजार परिसरातील खासगी सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने दीड महिन्याचं लेकरू आईच्या कुशीतून ओढून नेलं आहे. या घटनेला चार महिने झाले तरी ताब्यात ठेवलेलं बाळ परत करायला हे सावकार दाम्पत्य तयार नाही. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना साताऱ्यात घडली आहे.
बाळ परत मागितलं तर जीवे मारीन अशी धमकी देखील या सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने दिली. मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनी मध्ये राहणाऱ्या अभिषेक कुचेकर या युवकाने आर्थिक अडचणीमुळे सदर बाजार येथील खासगी सावकारी करणाऱ्या दाम्पत्य कडून गतवर्षी तीस हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची मुद्दल व व्याज पोटी कार्याने ६० हजार रुपये परत केले आहेत. एका वर्षात चौपटीने व्याज वसूल करून देखील आणखीन रकमेची मागणी करत आहेत.
याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र अजूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. सदर बझार येथील खासगी सावकारी करणाऱ्या संबंधित दाम्पत्यावर कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी कुचेकर कुटुंबीयांनी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासमोर नुकतीच आपली कैफियत मांडली असून बोऱ्हाडे यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.