Satara: ‘जर्मन अँगर’च्या शामियान्यात ‘साहित्या’ची अनोखी मेजवानी; वॉटर प्रूपसह सुरक्षित अन् मजबुतीला प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:07 IST2025-12-31T16:06:37+5:302025-12-31T16:07:01+5:30
99th Marathi Sahitya Sammelan: तब्बल ५० हजार स्क्वेअर फूट मंडप

Satara: ‘जर्मन अँगर’च्या शामियान्यात ‘साहित्या’ची अनोखी मेजवानी; वॉटर प्रूपसह सुरक्षित अन् मजबुतीला प्राधान्य
दत्ता यादव
सातारा : साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे संपूर्ण मंडप ‘जर्मन अँगर’ तंत्रज्ञानाच्या साह्याने उभारण्यात आला आहे. हा भव्य दिव्य मंडप एखाद्या शामियानापेक्षा कमी नसून, राज्यभरातील साहित्यप्रेमींना ग्रंथ, साहित्य, परिसंवाद अन् सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा आनंद या मंडपात लुटता येणार आहे.
सुरक्षितता व मजबुतीला प्राधान्य देण्यात आले आहे. या सर्व सुविधांमुळे हे साहित्यसंमेलन संस्मरणीय ठरणार आहे. सातारा शहरात होणाऱ्या भव्य साहित्य संमेलनासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी व्यापक तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तब्बल ५० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या भव्य मंडपात पुस्तक स्टॉल उभारण्यात आले असून, यामध्ये एकूण २५४ प्रकाशकांचे स्टॉल सहभागी झाले आहेत. वाचकांसाठी हे मंडप साहित्य पर्वणी ठरणार आहे.
वाचा : साताऱ्यात उद्यापासून ९९ वे मराठी साहित्य संमेलन; चार दिवस साहित्यिक, पुस्तकप्रेमींत उत्साह
याशिवाय मुख्य कार्यक्रमांसाठी स्वतंत्र ५० हजार स्क्वेअर फुटाचा मुख्य पेंडॉल उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी उद्घाटन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह फोक डान्स कार्यक्रम सादर होणार आहेत. मुख्य पेंडॉलमध्ये ४ हजार आसनांची व्यवस्था करण्यात आली असून, चटईसह सभोवतालच्या परिसरात आणखी ६ हजार नागरिक बसू शकतील, अशी विशेष सोय करण्यात आली आहे.
वाचा : ‘साहित्या’च्या मेळ्यात साताऱ्याच्या इतिहासाची अनुभूती!; संगम माहुली, अजिंक्यतारा, कास पठार चित्ररूपात अवतरणार
साहित्यिक उपक्रमांना चालना देण्यासाठी गझल कट्टा, कवी कट्टा, प्रकाशन कट्टा, बाल वाचन कट्टा आणि परिसंवाद कट्टा यांसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आले आहेत. त्यामुळे विविध वयोगटांतील रसिकांना आपापल्या आवडीचे कार्यक्रम अनुभवता येणार आहेत. व्हीआयपी पाहुण्यांच्या भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, एकावेळी ४०० व्यक्तींच्या जेवणाची सोय आहे. तसेच पोलिस परेड ग्राउंड येथे १०० फूड स्टॉल्स उभारण्यात आले असून, कार्यकर्ते व कर्मचारी यांच्यासाठी किमान १५०० जणांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलन स्थळाच्या मागील बाजूस असलेल्या स्मारक परिसरात चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काय आहे ‘जर्मन अँगर’
जर्मन अँगर हे तंत्रज्ञान अतिशय उत्कृष्ट आहे. जमिनीमध्ये कोणतेही खड्डे न काढता हा भव्य दिव्य मंडप उभा राहतो. केवळ जमिनीत मोठे खिळे मारले जातात. मंडपाचा ढाचा हा संपूर्ण नटबोल्टमध्ये जोडला जातो. वाॅटरप्रूप आणि सुरक्षेला प्राध्यान्य दिले गेले आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत दोनवेळा या मंडपाची उभारणी झाली आहे.