Satara: अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, कऱ्हाड तालुका हादरला; एकास अटक
By संजय पाटील | Updated: August 27, 2024 13:09 IST2024-08-27T13:09:03+5:302024-08-27T13:09:29+5:30
औषध देऊन मुलीचा केला गर्भपात

Satara: अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, कऱ्हाड तालुका हादरला; एकास अटक
कऱ्हाड : तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कऱ्हाड ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. तर गुन्हा दाखल असलेला दुसरा संशयित अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी पहाटे याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने एका आरोपीला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात अत्याचाराबाबतची फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी तालुक्यातील एका गावात राहते. संबंधित मुलीवर एका अल्पवयीन मुलासह अन्य एका युवकाने वारंवार अत्याचार केला. मुलीच्या घरी जाऊन त्यांनी हे कृत्य केले. वारंवार झालेल्या अत्याचारानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर एका संशयीताने तिला औषध देऊन तिचा गर्भपात केला.
याप्रकरणी मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीने कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अल्पवयीन मुलासह विनोद काटकर नामक युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी विनोद काटकर याला पहाटेच पोलिसांनी अटक केले आहे.
देशभरात अत्याचाराच्या घटना वाढत असताना कराड तालुक्यात एका मुलीवर दोघांनी अत्याचार केल्यामुळे तालुका हादरला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भिलारी तपास करीत आहेत.