Satara: स्वयंपाक सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 13:53 IST2024-12-23T13:53:13+5:302024-12-23T13:53:55+5:30
कऱ्हाड : स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे रविवारी ...

Satara: स्वयंपाक सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली
कऱ्हाड : स्वयंपाक सुरू असताना अचानक गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना कऱ्हाड तालुक्यातील विंग येथे रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर घराला आग लागून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले.
विंग येथील पाणंद नावच्या परिसरात तानाजी पांडुरंग कणसे यांचे राहते घर आहे. त्यांच्या घरात रविवारी सकाळी आठच्या सुमारास स्वयंपाक सुरू असताना अचानक धूर येऊ लागल्याने घरात असलेले तानाजी कणसे, त्यांची पत्नी, दोन मुले व वृद्ध आई घरातून बाहेर पळाले. त्यानंतर काही वेळातच सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, यामध्ये सिलिंडर तब्बल २५ फूट हवेत उडाले.
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच आग विझविण्यासाठी कऱ्हाड पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कणसे यांचे घर जळून खाक झाले होते. या आगीत रोख रकमेसह सोने व संसारोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले. वेळीच घरातील सर्वजण बाहेर पळाल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर तलाठी फिरोज आंबेकरी, क्लार्क संजय पाटील व अमोल चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला. यामध्ये तब्बल सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.