Satara Crime: जिममधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी अखेर जिमट्रेनरला अटक
By दत्ता यादव | Updated: May 6, 2023 13:48 IST2023-05-06T13:48:22+5:302023-05-06T13:48:37+5:30
गुन्हा दाखल झाल्यानंतर झाला होता फरार

Satara Crime: जिममधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी अखेर जिमट्रेनरला अटक
सातारा : जिममध्ये आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पसार झालेल्या जिमट्रेनरला अखेर चार दिवसांनंतर पकडण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले. ही कारवाई शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली.
रामसिंग असे पोलिसांनी अटक केलेल्या जिमट्रेनरचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका जिममध्ये रामसिंग हा ट्रेनर आहे. त्या जिममध्ये एक १७ वर्षीय तरूणी व्यायामासाठी जात होती. दि. २ मे रोजी सकाळी दहा वाजता संबंधित पीडित तरूणी जिमला गेली होती. त्यावेळी जिम ट्रेनर रामसिंग याने पीडितेला आॅफिसमध्ये बोलावून घेऊन ‘तुझे फॅट्स वाढलेले आहेत.’ असे बोलून चुकीचा स्पर्श केला. तसेच पीडितेला चेजिंगरुमपर्यंत ढकलत नेले. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केले.
या प्रकाराची माहिती पीडित तरूणीने तिच्या घरातल्यांना सांगितल्यानंतर तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी रामसिंगवर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर रामसिंग हा फरार झाला होता. शनिवारी सकाळी शहरातील एका बंगल्यात तो असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी रामसिंगला अखेर चार दिवसांनंतर त्या बंगल्यातून अटक केली. महिला पोलिस उपनिरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत.