खासगी सावकारीप्रकरणी राजुरीतील दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:40 IST2022-04-07T18:39:50+5:302022-04-07T18:40:50+5:30

संबंधित राजुरी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने संबंधितावर भीतीपोटी तक्रार दाखल करत नव्हते.

A case has been registered against two of them in a private lending case | खासगी सावकारीप्रकरणी राजुरीतील दोघांवर गुन्हा दाखल

खासगी सावकारीप्रकरणी राजुरीतील दोघांवर गुन्हा दाखल

कोळकी : राजुरी (ता. फलटण) येथील दोघांवर खासगी सावकारीप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, राजुरी (ता. फलटण) येथील गणेश बाळासो खुरंगे यांच्याकडून ईश्वर काळे व त्याचे मृत चुलते यांनी दहा टक्के व्याजाने एक लाख रुपये घेतले होते. त्याच्या मोबदल्यात सन २०२० ते ९ जून २०२१ पर्यंत वेळोवेळी दोन लाख ८० हजार रुपये दिले. तरीही संशयित गणेश बाळासो खुरंगे व त्याचा नातेवाईक डॉ. मधुकर गुलाबराव माळवे यांनी फिर्यादीस व्याजापोटी आणखी दोन लाख रुपये देण्याची मागणी केली.

तसेच वेळोवेळी फिर्यादीच्या दुकानावर जाऊन पैशासाठी दमदाटी, शिवीगाळ, घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादीच्या नावावरील चार गुंठे जागा नावावर करून देण्यासाठी दबाव टाकत होते. संबंधित राजुरी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने संबंधितावर भीतीपोटी तक्रार दाखल करत नव्हते. संबंधित संशयिताविरोधात गणेश शंकर काळे (वय २७) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करीत आहेत.

Web Title: A case has been registered against two of them in a private lending case