Satara: कऱ्हाडात ‘कार’नामा; सात वाहनांना उडवले, सहा जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 14:03 IST2025-04-26T14:03:27+5:302025-04-26T14:03:46+5:30

चालक महिला की पुरुष, गोंधळाचे वातावरण

A car heading towards Karad city overturned seven vehicles, six injured | Satara: कऱ्हाडात ‘कार’नामा; सात वाहनांना उडवले, सहा जण जखमी 

Satara: कऱ्हाडात ‘कार’नामा; सात वाहनांना उडवले, सहा जण जखमी 

कऱ्हाड : येथील विद्यानगर, कृष्णा कालव्याकडून कऱ्हाड शहरात जाणाऱ्या कारने अवघ्या तीनशे मिटर अंतरात सात वाहनांना उडवले. ही थरारक घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. या अपघातात कारसह चार दुचाकी, दोन रिक्षा व एका कारचे मोठे नुकसान झाले. सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपघातप्रकरणी चालक संजय सर्जेराव पवार (वय ६३ रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

संजय पवार, सुषमा पवार यांच्यासह रफिक मुजावर (३४ रा. चौंडेश्वरी नगर), विशाल उथळे (२२), कल्याण बेडके (३४, रा. सैदापूर), समीर चौधरी (२६, रा.सातारा), शिवानी भोसले (रा. खोडशी) अशी जखमींची नावे आहेत.

संजय पवार व पत्नी सुषमा हे शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास कारने कृष्णा कॅनॉल बाजूकडून कऱ्हाड शहरात येत होते. कालव्या पुढच्या बाजूला कारने प्रथम रिक्षाला धडक दिली. यानंतर एका दुचाकीला धडक दिली. कृष्णा पुलावरून शहरात आल्यावर कारने बालाजी हॉस्पिटलजवळ कारला जोराची धडक दिली. तेथेच उभ्या एका दुचाकीला धडक देऊन कारने बालाजी हॉस्पिटल समोर उभा असलेल्या रिक्षा व दोन दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवर रिक्षा पलटी झाली. रिक्षावर कारही पलटी झाली. कारच्या धडकेने बालाजी हॉस्पिटलजवळ असलेले एक झाड पडले आहे. अपघातानंतर नागरीकांनी पलटी झालेली कार सरळ करून त्यातील महिला व नागरिकांना बाहेर काढून खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दरम्यान, कृष्णा कालव्यापासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत शहरात आलेल्या कारमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हॉस्पिटलसमोर दोन कार अन् तीन अपघातग्रस्त दुचाकी पडल्या होत्या. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात विभागाचे पोलिस घटनस्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत केली. सर्व अपघातग्रस्त वाहने कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आणली.

चालक महिला की पुरुष

कृष्णा कालव्यापासून रस्त्यात दिसेल त्या वाहनाला धडक देत निघालेल्या कारचा अनेक वाहनचालकांनी पाठलाग केला. अखेर बालाजी हॉस्पिटलजवळ एक रिक्षा, कार व तीन दुचाकींना धडक दिल्यानंतर ती पलटी झाली. यावेळी अपघतग्रस्त वाहनांचे मालक व उपस्थित नागरिकांनी महिला कार चालवत असल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी संजय पवार हे कार चालवत असल्याचे सांगितल्याने अपघातग्रस्तांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: A car heading towards Karad city overturned seven vehicles, six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.