साताऱ्यात उद्यापासून ९९ वे मराठी साहित्य संमेलन; चार दिवस साहित्यिक, पुस्तकप्रेमींत उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:46 IST2025-12-31T15:45:57+5:302025-12-31T15:46:35+5:30
उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर रविवारी समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार

साताऱ्यात उद्यापासून ९९ वे मराठी साहित्य संमेलन; चार दिवस साहित्यिक, पुस्तकप्रेमींत उत्साह
सातारा : ऐतिहासिक सातारा शहरात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्या, गुरुवार, दि. १ जानेवारीपासून सुरू होत आहे. हे संमेलन चार दिवस चालणार आहे, तर दि. २ जानेवारीला उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर रविवारी समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.
सातारा शहरातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ‘पानिपत’कार विश्वास पाटील, तर स्वागताध्यक्ष हे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. चार दिवसांच्या संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत. १ जानेवारीला ध्वजारोहण, ग्रंथप्रदर्शन उद्घाटन, कविकट्टा, गझलकट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथदिंडी, साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान, बहुरूपी भारुड हे कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार, दि. २ जानेवारीला सकाळी ११ ला उद्घाटन होणार असून, त्यानंतर दिवसभरात कवी संमेलन, परिचर्चा, परिसंवाद, नाटक होईल. शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी कथाकथन, मुलाखत, पुस्तक चर्चा, आदी कार्यक्रम होणार आहेत. रविवार, दि. ४ रोजी दुपारी साडेचारला साहित्य संमेलनाचा समारोप होईल. यावेळी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चाैधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.