साताऱ्यात कोयना साठ्यात उच्चांकी ९ टीएमसी वाढ; अनेक धरणांतून विसर्ग, वाहतूक विस्कळीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:36 PM2021-07-22T12:36:25+5:302021-07-22T12:36:37+5:30

जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. पण, बुधवारपासून पावसाने रौद्ररूप धारण केले आहे.

9 TMC increase in Koyna stock in Satara; Discharge from several dams | साताऱ्यात कोयना साठ्यात उच्चांकी ९ टीएमसी वाढ; अनेक धरणांतून विसर्ग, वाहतूक विस्कळीत 

साताऱ्यात कोयना साठ्यात उच्चांकी ९ टीएमसी वाढ; अनेक धरणांतून विसर्ग, वाहतूक विस्कळीत 

Next

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुधवारपासून धो-धो पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याबरोबर काही ठिकाणची बंद झाली. तर कोयना धरण साठ्यात २४ तासांत साडे नऊ टीएमसीने वाढ झाली. गुरूवारी सकाळच्या सुमारास धरणात ६६.७५ टीएमसी साठा झाला होता. गेल्या काही वर्षांतील हा उच्चांक ठरला आहे. दरम्यान, प्रमुख अनेक धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.          

जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे. पण, बुधवारपासून पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर या भागात धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. ओढे, ओघळ भरुन वाहत आहेत. अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली. तसेच काही रस्त्यावर दगड व पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. तर मेढा-महाबळेश्वर मार्गावर केळघरजवळ रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सातारा शहराजवळ संगम माहुली येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली. त्यामुळे अंत्यसंस्कार कोठे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

या पावसामुळे कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा अशा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच कण्हेर, उरमोडी, कोयना धरण पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असल्याने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नदीतील पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे. कोयना परिसरात धो-धो पाऊस होत आहे. त्यामुळे धरणात वेगाने पाणीसाठा झाला. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणात जवळपास साडे नऊ टीएमसीने पाणीसाठा वाढला. ६६.७५ टीएमसी साठा झाला होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून पाणी सोडण्याबाबत नियोजन आहे.  

नवजा, महाबळेश्वरला ४०० मिलीमीटरवर पाऊस... 

पश्चिम भागात जोरदार वृष्टी होत आहे. गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ३४७ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत १८५७ मिलीमीटरची नोंद झाली. नवजाला ४२७ व आतापर्यंत २५५१ मिलीमीटर पाऊस झाला. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४२४ व आतापर्यंत २५०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवजा आणि महाबळेश्वरला गेल्या काही वर्षांतील उच्चांकी पाऊस झाला आहे. 

Web Title: 9 TMC increase in Koyna stock in Satara; Discharge from several dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app