दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त
By दत्ता यादव | Updated: February 28, 2025 13:14 IST2025-02-28T13:13:03+5:302025-02-28T13:14:02+5:30
सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी ...

दुसऱ्यांना फसवलं, स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं; सातारा जिल्ह्यात आरोपींची ५९ कोटींची मालमत्ता होणार जप्त
सातारा : कोणी सेवानिवृत्त होऊन आयुष्याची पुंजी पतसंस्थेत ठेवली, तर कोणी सहकारी बँकेत गुंतवली. उतारवयात उपयोगाला येणारी ही पुंजी भ्रष्ट्र लोकांनी मात्र गिळंकृत केली. ज्यांनी दुसऱ्यांना फसवलं. त्यांनीच स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. अशा आरोपींची ५९ कोटी ५७ लाखांची मालमत्ता आता जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा ठेवीदारांसाठी आशेचा किरण आहे.
आर्थिक फसवणुकीचे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. पतसंस्था, सहकारी बँका, बचत गट, शेअर मार्केट अशा संस्थांमध्ये पैसे गुंतवून अनेकांवर पश्चातापाची वेळ आली आहे. अनेक बँका, पतसंस्था बंद पडल्या. त्यामध्ये गुंतवलेले पैसे मात्र, परत मिळविण्यासाठी ठेवीदारांना शासनदरबारी हेलपाटे मारावे लागतात. अशा अपहार प्रकरणातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यापासून पैसे वसूल करण्यापर्यंतची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि वेळखाऊ आहे. पोलिस मुख्यालयाशेजारी असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचे तपास सोपविण्यात आले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आरोपींच्या अटकेपासून त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेपर्यंत शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.
वाई येथील हरिहरेश्वर बँकेतील ठेवीदारांना तब्बल ६० कोटी रुपये परत मिळवून देण्यात या शाखेचा मोठा वाटा आहे. आरोपींची मालमत्ता जप्त करताना अनेक अडचणी येतात. त्यांच्या मालमत्तेची खरी कागदपत्रे जमा करणे, मालमत्ता कोणत्या ठिकाणी आहेत, याचा शोध घेणे. कोणत्या मालमत्तेवर किती कर्ज आहे, याची सारी माहिती घेऊन नंतर आरोपीला अटक केली जाते. केवळ अटक होऊनही तातडीने आरोपींकडून रिकव्हरी होत नाही.
अटक झाल्यानंतर आरोपींकडून फार फार तर त्याच्या छुप्या मालमत्तेची माहिती मिळते. त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी बराच कालावधी लागतो. प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून मालमत्तेच्या लिलावासाठी मंजुरी घेतली जाते. या मंजुरीनंतर आरोपीच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. त्यानंतरच ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांना त्यांची रक्कम परत दिली जाते. सध्या अशा प्रकारे आर्थिक गुन्हे शाखेने ८ प्रस्ताव पाठविले आहेत. या प्रस्तावांमधील ५९ कोटी ५७ लाखांची आरोपींची मालमत्ता जप्त होणार आहे.
३८ पैकी २४ गुन्ह्यांचा तपास पूर्ण
सातारा जिल्ह्यात गत दहा वर्षांत आर्थिक फसवणुकीचे ३८ गुन्हे घडले आहेत. यातील २४ गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून पूर्ण झाला आहे. अद्याप १४ गुन्ह्यांचा तपास बाकी आहे. याचे कारण अपुरे मनुष्यबळ हे आहे. पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत २१ अधिकारी व कर्मचारी होते. सध्या या शाखेत केवळ सहाजण आहे.
आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया किचकट आहे. प्रस्तावात कोणतीही त्रुटी राहू नये, याची काळजी घेणे गरजेचे असते, असे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. - शिवाजी भोसले-सहायक पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा