साताऱ्यात लवकरच हेल्मेट सक्ती होणार, वर्षभरात अपघातात गेले 'इतके' जीव
By दीपक शिंदे | Updated: March 11, 2024 15:27 IST2024-03-11T15:25:42+5:302024-03-11T15:27:43+5:30
बळींची संख्या रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी होणार

साताऱ्यात लवकरच हेल्मेट सक्ती होणार, वर्षभरात अपघातात गेले 'इतके' जीव
सातारा: जिल्ह्यात अपघातातील बळींची संख्या वाढत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासन चिंतेत आहे. त्यामुळे भविष्यात हे अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असून, कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट सक्ती करण्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.
जिल्ह्यात रोज अनेक ठिकाणी भीषण अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना आपला नाहक जीव गमवावा लागत आहे. रस्त्यातील खड्डे, धोकादायक वळण, ब्लॅकस्पाॅट हटविण्यात आले तरी सुद्धा मृत्यूचा आकडा का वाढत आहे. यावर जिल्हा पोलिस दलाने आढावा घेतला. त्यावेळी कार चालविताना सीटबेल्ट आणि दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांचा जीव गेल्याचे समोर आले. परिवहन आयुक्तांनी मार्च २०२२ मध्ये हेल्मेट सक्तीचे परिपत्रक काढले होते. हेल्मेट आणि सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले असताना अनेकजण हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करीत नाहीत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर विमा कंपनी देखील अपघातावेळी दुचाकी चालकाने हेल्मेट घातले होते का किंवा चारचाकी चालकाने सीटबेल्ट लावला होता का, याची पडताळणी करते. त्यामुळे हेल्मेट व सीटबेल्ट घातल्यास आपला जीव वाचविता येईल. तसेच विम्यासाठी क्लेम करणे देखील सोयीचे होते. या सर्व बाबींचा विचार करून सातारा जिल्ह्यात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. सुरूवातीला वाहनधारकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.
वर्षेभरात अपघातात ५०१ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात २०२३ मध्ये अपघातात तब्बल ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ खुनाचे प्रकार घडले असून, ४८ जणांनी आत्महत्या केली आहे. म्हणजे सर्वाधिक बळी हे अपघातातील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अपघातात जाणारे नाहक जीव वाचविण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आता पोलिसही नोंद घेणार
अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वाराने हेल्मेट अथवा कार चालकाने सीट बेल्ट लावला होता का, हे पोलिस आता त्यांच्या खबरी अहवालामध्ये नोंद करणार आहेत. पूर्वी अशाप्रकारची नोंद केली जात नव्हती. त्यामुळे अपघातातील मृत व्यक्तीचे कारण समोर येत नव्हते.
वाहन चालकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी सजग असायला हवे. वर्षभरात सीटबेल्ट आणि हेल्मेट न घातल्याने बऱ्याच लाेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामुळे सुरूवातीला वाहन चालकांमध्ये जनजागृती करून नंतर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे. - समीर शेख-पोलिस अधीक्षक, सातारा