गृहमंत्र्यांच्या सचिवाच्या गाडीची काच फोडून 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 14:23 IST2021-12-13T14:22:38+5:302021-12-13T14:23:13+5:30
महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या खासगी सचिवाच्या गाडीतून रोख रकमेसह महत्वाचे कागदपत्रे चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

गृहमंत्र्यांच्या सचिवाच्या गाडीची काच फोडून 50 हजारांसह महत्त्वाचे कागदपत्रे चोरीला
सातारा: महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या खासगी सचिवाला एका चोराने 50 हजारंचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे यांच्या कारची काच फोडून कारमधून 50 हजार रुपये आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.
बाबासाहेब शिंदे सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये लग्न सोहळ्यासाठी गेलेले असताना हा प्रकार घडला. याबाबत बाबासाहेब शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे. पोलीस सध्या चोरांचा शोध घेत आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात गृहमंत्र्यांच्या सचिवांना चोरांनी झटका दिल्याची चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं ?
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे फलटण तालुक्यातील धुळदेव येथे एका लग्नात सहभागी होण्यासाठी आले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडली आणि गाडीतून 50 हजारांसह एक बॅग लंपास केली. शिंदे आपल्या गाडीकडे आल्यानंतर त्यांना हा घडलेला प्रकार समजला. यानंतर शिंदे यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली. आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.