जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांनी बिल भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST2021-03-19T04:38:10+5:302021-03-19T04:38:10+5:30
सातारा : राज्यात सध्या विजेची थकित बिल वसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू असून, कृषिपंपधारक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसू लागलाय. पण, ...

जिल्ह्यात २५ हजार शेतकऱ्यांनी बिल भरले
सातारा : राज्यात सध्या विजेची थकित बिल वसुलीची मोहीम जोरदारपणे सुरू असून, कृषिपंपधारक शेतकऱ्यांनाही याचा फटका बसू लागलाय. पण, सातारा जिल्ह्यात थोड्याच शेतकऱ्यांची वीज तोडली असून, थकित बिल भरण्यासाठी त्यांना आवाहन करण्यात येत आहे. यामुळे २५ हजार शेतकऱ्यांनी वीजबिल भरून सहकार्य केले आहे. जिल्ह्यात कृषी वीज धोरणानुसार कृषिपंप थकित वीजबिल ६६६ कोटी आहे.
कृषिपंपधारकांना ३,५,१० अशा अश्वशक्तीनुसार कृषिपंपाचे बिल आकारले जाते. जिल्ह्यात कृषिपंपधारकांची संख्या जवळपास पावणेदोन लाखांहून अधिक आहे. यामध्ये मागील पाच वर्षांपासून थकीत असणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. असे असलेतरी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. कंपनीचे कर्मचारी गावोगावी जाऊन जागृती करत आहेत. त्यासाठी ऑडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. याद्वारे शासनाच्या कृषिधोरण योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा फायदाही होताना दिसून येत आहे. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळू लागलाय.
शासनाच्या कृषी धोरणानुसार थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरायची आहे. तसेच शासनाकडून सवलतीवरील व्याज व दंड माफ करण्यात येत आहे. यामुळे ६० टक्के रक्कम भरायची असते, असे सांगण्यात आले.
जिल्ह्यात सप्टेंबरअखेर कृषी वीज धोरणानुसार ६६६ कोटी रुपयांची वीजबिलाची थकबाकी असलीतरी कृषी वीज धोरणाचा फायदा घेतल्यास त्यातील अर्धी रक्कम कमी होऊ शकते.
जिल्ह्यात कृषिपंपचालक
१,८१,५६०
वीजबिल थकबाकी
६६६.६२ कोटी
तालुकानिहाय कृषिपंपचालक आणि थकबाकी (कोटीत)
जावळी ३५१४ ४.४८
कऱ्हाड २८९५४ १२१.७०
खंडाळा ९०४१ २२.८६
खटाव २९२९७ १०७.९४
कोरेगाव २५१९१ १००.१३
महाबळेश्वर १७९५ १.४४
माण २०२७८ ७३.८७
पाटण ५०१६ १५.८६
फलटण २९४०० १२३.४२
सातारा १७५७९ ७२.४७
कोट :
जिल्ह्यात कृषिपंप थकित वीजबिल भरण्याबाबत महावितरणकडून तगादा सुरू होता. त्यामुळे शासनाच्या कृषी वीज धोरणानुसार थकबाकी रक्कम भरण्यात आली. त्यामुळे बिलात सवलत मिळाली. तसेच शेतीचा वीजपुरवठाही सुरळीत राहिला आहे.
- राजाराम पाटील
...........
मागील दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान झाले. तरीही वीज मोटारीचे बिल भरावेच लागत आहे. बिल भरले नाही तर तोटाच होणार आहे. शासनाने वीज मोटारीचे संपूर्ण बिल माफ करायला हवे होते.
- परशुराम पवार
.................
अन्यायकारक वीजबिल वसुलीविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही. खंडणी वसूल केल्यागत वसुली सुरू केली आहे. ती तातडीने थांबवली पाहिजे. मीटर तपासून बिल देणारी एजन्सी नसताना अदांजे खोटी बिले तयार केली व वितरीत करून काही अंशी वसुली केली. ही बाब फौजदारी गुन्ह्याची आहे.
- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
..................
मागील पाच वर्षांपासून कृषिपंपाचे वीजबिल थकीत असणाऱ्या काही जणांवर कारवाई केली आहे. मात्र, शासन कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांना आवाहन करून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २५ हजार शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरले आहे. शेतकऱ्यांनी यापुढेही सहकार्य करावे.
- गौतम गायकवाड, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी, सातारा