१७० जवान आर्वीची शान; त्यांच्यासाठी कमान!; सातारा जिल्ह्याला शौर्याचा वारसा

By जगदीश कोष्टी | Updated: August 16, 2025 18:36 IST2025-08-16T18:36:03+5:302025-08-16T18:36:27+5:30

आजी-माजी संघटनेचा उपक्रम

170 soldiers in Arvi village of Satara district, The veterans association erected a welcome arch | १७० जवान आर्वीची शान; त्यांच्यासाठी कमान!; सातारा जिल्ह्याला शौर्याचा वारसा

१७० जवान आर्वीची शान; त्यांच्यासाठी कमान!; सातारा जिल्ह्याला शौर्याचा वारसा

जगदीश कोष्टी

सातारा : पानमळ्याचे गाव म्हणून ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्यातील अवघ्या तीन हजार उंबऱ्याच्या आर्वी गावाने आतापर्यंत १७० जवान भारतमातेच्या सेवेसाठी दिले आहेत. हे जवान म्हणजे जणू या गावची शानच आहेत. यांच्या कार्याचा गौरव कायम स्मरणात राहावा, यासाठी आजी-माजी सैनिक संघटनेने स्वागत कमान उभारली आहे. या कमानीचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी स्वातंत्र्यदिनी मेजर जनरल नंदकिशोर जाधव यांच्या हस्ते होत आहे.

सातारा जिल्हा हा शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा मानला जातो. मिलिटरी अपशिंगेसारख्या असंख्य गावांना शौर्याचा वारसा लाभलेला आहे. कोरेगाव तालुक्यातील आर्वी हे गावही त्यापैकीच एक. सर्वसाधारणपणे ९ हजार लोकसंख्येच्या या गावाने आतापर्यंत १७० नरवीरांना जन्म दिला. त्यांनी भारतमातेच्या संरक्षणासाठी सीमेवर जाणे पसंत केले. त्यातील दोघे जण शहीद झाले आहेत.

या गावातील शूरवीरांनी भारत-पाकिस्तान यांच्यात झालेले युद्ध, यामध्ये १९६५, १९७१ आणि १९९९ला झालेल्या कारगिल युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. या जवानांच्या स्मृती जतन करणे आणि भावी पिढीत देशसेवेची बीजं अंकुरण्यासाठी गावातील आजी-माजी सैनिक संघटनेने एक भव्य कमान उभारली आहे.

तीन अधिकारी भावंडं

या गावच्या जाधव कुटुंबातील तीन भावंडे सैन्यात अधिकारी होते. त्यातील मेजर जनरल नंदकिशोर जाधव, मेजर जनरल गुरूदत्त जाधव अन् निवृत्त कर्नल राजकुमार जाधव या अधिकारी भावंडांचा गावाला कायम अभिमान राहिला आहे. विशेष म्हणजे यांचे वडील साहेबराव जाधव हे मेजर होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले होते.

..अशी आहे फौज

  • सैन्यात कार्यरत : ७०
  • निवृत्त - १००
  • शहीद - २
  • अधिकारी - ३


सामाजिक भानही

गावातील आजी-माजी संघटना सामाजिक कार्यातही अग्रेसर असून, या संघटनेने जलजीवन मिशन अंतर्गत गावातील पाणीटंचाई निवारणार्थ मदतीसाठी सहकार्य केले आहे. गावात दारूबंदीसाठी ठराव घेतला आहे. तसेच गावातील हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांना आधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Web Title: 170 soldiers in Arvi village of Satara district, The veterans association erected a welcome arch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.