दिव्यांगाच्या बोगस प्रमाणपत्राची व्याप्ती वाढली; सातारा जिल्ह्यात आणखी १६ गुरुजी सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:29 IST2025-08-05T19:29:13+5:302025-08-05T19:29:54+5:30
पाचवी यादी जाहीर : ६ जण तपासणीसाठी गैरहजर; आतापर्यंत ६० जणांचे फुटले बिंग

दिव्यांगाच्या बोगस प्रमाणपत्राची व्याप्ती वाढली; सातारा जिल्ह्यात आणखी १६ गुरुजी सापडले
सातारा : बदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून, पाचव्या यादीत आणखी १६ गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे. यामुळे आतापर्यंत ६० प्राथमिक शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्रात बोगसपणा दिसून आलेला आहे. तसेच पाचव्या यादीतही ६ गुरुजी पडताळणीसाठी गैरहजर राहिले. यामुळे बोगस प्रमाणपत्राबाबत व्याप्ती वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक विभागांतर्गत काही शिक्षकांनीबदलीत लाभ मिळण्यासाठी स्वत:च्या तसेच कुटुंबातील व्यक्तीचे दिव्यांग आणि आजारपणाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. शिक्षण विभागाकडे अशा ५८६ प्रमाणपत्रांची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी या प्रमाणपत्रांची तपासणी मोहीम सुरू केली.
यासाठी मागील सवा महिन्यापासून छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय आणि दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागाकडून पाच याद्या पाठविण्यात आलेल्या होत्या. पडताळणीनंतर त्याचे अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत.
शिक्षण विभागाने पाचवी ५७ शिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची यादी रुग्णालयाला दिली होती. याची पडताळणी झालेली आहे. यामध्ये ५१ गुरुजींनीच पडताळणीला हजेरी लावली. ६ जण गैरहजर राहिले, तर दिव्यांगांची ३२ प्रमाणपत्रे योग्य आढळली. पण, १६ जणांचे दिव्यांग प्रमाणपत्र अमान्य झाले आहे. प्रमाणपत्र अमान्य झालेल्या १६ आणि पडताळणीसाठी गैरहजर ६ असे मिळून २२ जणांना नोटीस पाठविण्यात येणार आहे.
आतापर्यंत तिघेजण निलंबित; अनेकांवर टांगती तलवार !
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी या प्रकरणात आतापर्यंत तिघांवर कारवाई केलेली आहे. माण तालुक्यातील सोकासन येथील जिल्हा परिषद शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक विनायक पानसांडे यांचे निलंबन झाले आहे. तसेच आता कऱ्हाड तालुक्यातील आगाशिवनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सुरेखा प्रभाकर वायदंडे आणि माण तालुक्यातील काळेवाडी शाळेतील उपशिक्षक श्रीकांत विष्णू दोरगे यांनाही निलंबित केले आहे. आणखी काही शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
३२७ प्रमाणपत्रांची पडताळणी..
५८६ गुरुजींनी स्वत: आणि नातेवाईक दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिलेले आहे. यातील ३२७ प्रमाणपत्रांची पडताळणी झालेली आहे. यामध्ये योग्य प्रमाणपत्रे २२५, तर ६० मध्ये बोगसपणा आढळला. तर २७ शिक्षक पडताळणीसाठी आलेच नाहीत.