Satara ZP Election 2026: उमेदवारी अर्जांचा पाऊस; गटांसाठी ६३२, गणांसाठी १०५९ अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:39 IST2026-01-23T14:38:14+5:302026-01-23T14:39:26+5:30
कराड तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार रिंगणात

Satara ZP Election 2026: उमेदवारी अर्जांचा पाऊस; गटांसाठी ६३२, गणांसाठी १०५९ अर्ज दाखल
सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, दोन्ही निवडणुकांसाठी एकूण १ हजार ६९१ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी ६३२ तर पंचायत समितीच्या १३० गणांसाठी १ हजार ५९ नामनिर्देशनपत्रे भरली आहेत. गट आणि गणांसाठी सर्वाधिक अर्ज हे कराड तालुक्यातून सादर झाले आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ तालुक्यांतील पंचायत समितीच्या १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिंदेसेना, काॅंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षही रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी बुधवार, दि. २१ हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या मुदतीत पंचायत समिती गणांसाठी १ हजार ५९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. तर जिल्हा परिषद गटांसाठी ६३२ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली. त्यामुळे या निवडणुकीत अधिक संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट असून, यासाठी १६ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत. वाई तालुक्यात चार गटांसाठी ३६, खंडाळ्यात तीन गटांसाठी ५१ अर्ज दाखल झाले आहेत. फलटणला आठ गटांसाठी ६४, माणच्या पाच गटांसाठी ४०, खटावला सात गटांसाठी ६३, कोरेगाव तालुक्यात सहा गटांसाठी ५३, सातारा तालुक्यातील आठ गटांसाठी ९५ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. त्याचबरोबर जावळी तालुक्यात तीन गटांसाठी ३२, पाटणला सात गटांसाठी ५० आणि कराड तालुक्यातील १२ गटांसाठी १३२ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत.
पंचायत समित्यांचे १३० गण आहेत. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील चार गणांसाठी ३४ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत. वाईतील आठ गणांसाठी ४५, खंडाळा तालुक्यात सहा गणांसाठी ७१, फलटणला १६ गणांसाठी ११९ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. माण तालुक्यात १० गणांसाठी ८७, खटावला १४ गणांसाठी ११२, कोरेगावला १२ गणांसाठी ९४, सातारा तालुक्यातील १६ गणांसाठी तब्बल १४३ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत. त्याचबरोबर जावळी तालुक्यात सहा गणांसाठी ५८, पाटणला १४ गणांसाठी ९२ आणि कराड तालुक्यात २४ गणांसाठी २०४ अर्ज दाखल झाले आहेत.
कराडला गट अन् गणांसाठी ३३६ नामनिर्देशनपत्रे...
जिल्ह्यात कराड तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी सर्वाधिक ३३६ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत. महाबळेश्वर तालुक्यात एकूण ५०, वाई तालुक्यात ८१, खंडाळा तालुक्यात १२२, फलटणला १८३, माण तालुक्यात १२७, खटावला १७५, कोरेगाव तालुक्यात १४७, सातारा २३८, जावळी ९०, पाटण तालुक्यात १४२ नामनिर्देशनपत्रे दाखल आहेत.