Sangli ZP: झिरो रोस्टर पद्धतीने आरक्षण सोडत, दिग्गजांच्या मनसुब्यावर पडले पाणी; अध्यक्ष पदाचे दावेदार कोण...वाचा
By अशोक डोंबाळे | Updated: October 14, 2025 18:30 IST2025-10-14T18:30:16+5:302025-10-14T18:30:33+5:30
काहींना अनपेक्षित लागली लॉटरी : महिलांचा टक्का वाढल्याचा कुणाला होणार फायदा

Sangli ZP: झिरो रोस्टर पद्धतीने आरक्षण सोडत, दिग्गजांच्या मनसुब्यावर पडले पाणी; अध्यक्ष पदाचे दावेदार कोण...वाचा
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीमध्ये झिरो रोस्टरचा वापर केल्यामुळे दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांच्यासाठी मिनी मंत्रालयाचे दरवाजे बंद झाले आहेत. नव्या आरक्षण सोडतीची काही माजी सदस्यांना लॉटरी लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. आरक्षण सोडत निघताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू करून थेट मतदारसंघच गाठले. या सोडतीमध्ये ६१ सदस्यांपैकी ३१ सदस्य महिला असून, महिलांचा वाढता टक्का महाविकास आघाडी की महायुतीला तारणार, हे लवकरच निश्चित होईल.
नोव्हेंबरच्या मध्यावर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा प्रत्यक्ष बिगुल वाजण्याचे संकेत आहेत. जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समित्यांच्या गणांची आरक्षण सोडत झाली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, यंदाची निवडणूक ही पहिलीच निवडणूक गृहित धरून उतरत्या क्रमानुसार आरक्षण काढले. नव्या बदलानुसार जिल्ह्यात यंदा अनुरूप बदलाची आस धरून बसलेल्या अनेक राजकीय नेत्यांना धक्का बसला आहे.
खासदार, आमदार होता आले नाही, किमान मिनी मंत्रालयात तरी जायचेच, असे स्वप्न पाहिलेल्या दिग्गजांची आरक्षण सोडतीमध्ये दांडी उडाली. वाळवा आणि मिरज या दोन तालुक्यांत प्रत्येकी ११ गट आहेत. या दोन्ही तालुक्यांत महिलांसाठी एकूण १५ जागा आरक्षित आहेत. यात मिरज तालुक्यात आठ तर वाळवा तालुक्यात सात महिला सदस्यांची संख्या असणार आहे.
मिरज तालुक्यातील कवलापूर, मालगाव, म्हैसाळ आणि बेडग जिल्हा परिषदेचे गट अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे येथील दिग्गजांची राजकीय कोंडी झाली. या गटातील इच्छुकांचा शोध घेण्याचे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना आदेशही दिले.
ओबीसीत स्पर्धा
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) १६ जागा आरक्षित आहेत. याठिकाणी दिग्गज ओबीसी नेत्यांनी निवडणूक लढवण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. नव्याने कुणबी मराठा समाजानेही ओबीसी दाखले काढले असून, तेही इच्छुक आहेत. यामुळे यावर्षी ओबीसी गटातून मोठी चुरस निर्माण होईल, असे जाणकारांचे मत आहे.
मिरज, वाळवा, जत तालुके निर्णायक
मिरज, वाळवा तालुक्यात प्रत्येकी ११ गट आणि जत तालुक्यात ९ जिल्हा परिषद गट आहेत. एकूण ६१ सदस्यांपैकी ३१ सदस्य तीन तालुक्यांतून निवडून येणार आहेत. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी या तीन तालुक्यांवरच लक्ष केंद्रित केले आहे.
तासगावात सहापैकी पाच गट खुले
तासगाव तालुक्यातील सहापैकी पाच गट सर्वसाधारण झाले आहेत. यामध्ये थेट महिलांसाठी एकही गट आरक्षित नाही. मात्र, सर्वसाधारण गटातून महिला निवडणूक लढवू शकतात. कडेगाव तालुक्यात चारही गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यात तीन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर एक सर्वसाधारण आहे.
अध्यक्ष पदाचे दावेदार
जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. यामध्ये भाजपाकडून मीनाक्षी नानासाहेब महाडिक, हर्षदा राहुल महाडिक, रेणुकादेवी सत्यजित देशमुख, शिंदेसेनेकडून शीतल अमोल बाबर, सोनिया सुहास बाबर, रयत क्रांतीकडून मोहिनी सागर खोत, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवयानी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया देवराज पाटील, संगीता संभाजीराव पाटील, अश्विनी नाईक, भाग्यश्री वैभव शिंदे, मेघा संभाजी कचरे, काँग्रेसकडून पूजा विशाल पाटील, वैशाली शांताराम कदम यांची नावे चर्चेत आहेत.