कवठेमहांकाळ : जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकीय कारणावरून नागज येथे दिनकर अशोक धोकटे, रहिवासी ढालगाव, ता. कवठेमहांकाळ यांना जबरदस्तीने चारचाकी बसवून डोंगरावर नेऊन मारहाण केल्यानंतर त्यांचा मोबाइल व सोन्याची चेन लुटल्याप्रकरणी नितीन अमोने (रहिवासी निमज, ता. कवठेमहांकाळ), कुणाल अमोने (रहिवासी निमज, ता. कवठेमहांकाळ), सचिन बोरकर (रहिवासी किडेबिसरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि गब्बर करचे (रहिवासी पाचेगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागज फाटा येथील एका हॉटेलसमोर दिनकर धोकटे बसले असताना, पांढऱ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या गब्बर करचे यांनी ‘पैलवान नितीन अमोने यांनी बोलावले आहे’, असे सांगून त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर त्यांना नागज डोंगरावरील पवनचक्की परिसरात नेण्यात आले. त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या दोन चारचाकींतून नितीन अमोने, कुणाल अमोने व सचिन बोरकर आले. नितीन अमोने यांनी दिनकर धोकटे यांना गाडीतून खाली ओढून शिवीगाळ केली आणि विचारले की, विरोधक विकास हाक्केचा प्रचार का करतोस? माझी टिप का देतोस?’ त्यांना मारहाणही केली. यानंतर सचिन बोरकर, कुणाल अमोने व गब्बर करचे यांनीही रबरी पाइप तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान दिनकर धोकटे खाली कोसळल्यावर नितीन अमोने यांनी त्यांच्याकडील अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा मोबाइल तसेच सव्वातीन तोळे वजनाची, सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून घेतली. तसेच ‘२५ लाख रुपये खंडणी दे; अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सचिन बोरकरला अटक करण्यात आली आहे. तिघे फरार झाले आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.
Web Summary : In Sangli, a youth was assaulted and robbed over a political rivalry linked to local elections. Accused demanded ₹25 lakh extortion. Police arrested one; investigation underway.
Web Summary : सांगली में चुनाव विवाद को लेकर एक युवक को पीटा गया और उससे 25 लाख रुपये की रंगदारी मांगी गई। पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया, जांच जारी है।