सावधान! तुमचा आवाज चोरून केले जाऊ शकते बँक खाते साफ, ‘एआय’च्या माध्यमातून गंडा घालण्याचे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:54 IST2023-08-17T17:54:02+5:302023-08-17T17:54:22+5:30
फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

सावधान! तुमचा आवाज चोरून केले जाऊ शकते बँक खाते साफ, ‘एआय’च्या माध्यमातून गंडा घालण्याचे प्रकार
शरद जाधव
सांगली : अनोळखी क्रमांक... त्यावरून आलेल्या ओळखीच्या, कुटुंबातील सदस्याचा कॉल... विश्वास ठेवून आपली वैयक्तिक काही माहिती देत असाल तर थोडे थांबा... एआय (आर्टिफिशियल इंटिलिजंट)च्या माध्यमातून हुबेहूब आवाज काढून बँक खात्याची, पिन आणि ओटीपीविषयक माहिती घेऊन गंडा घालण्याचे प्रकार आता होत आहेत. फसवणुकीचा हा नवीन फंडा अनेकांना माहीत नसल्याने यात फसवणूक होण्याचीच शक्यता अधिक आहे.
बँकेतून बोलत असल्याचे सांगत, लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगून, तर कधी थेट मोबाइल क्रमांकच हॅक करून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. सायबर पोलिसांकडून याबाबत प्रबोधन करण्यात येत असल्याने आता जनतेतही याबाबत थोडीफार तरी सजगता दिसून येते. मात्र, आता वेगाने वाढत असलेल्या ‘एआय’चा वापर करून घेत आता ऑनलाइन गंडा घालणारे फसवणुकीचे प्रकार करत आहेत.
काय आहे व्हॉइस क्लोन फ्रॉड...?
एआयच्या माध्यमातून हुबेहूब आवाज काढून ही फसवणूक केली जाते. यात अनेकदा आपल्याच कुटुंबातील आवाज घेतला जातो. व्हाइस रेकॉर्डिंगसह अन्य मार्गांनी हा ‘व्हाइस’ मिळवला जातो. आपल्याच घरातील व्यक्ती बोलत आहे असे समजून अनेकजण बँकेसह इतर वैयक्तिक माहिती, पिन क्रमांक, ओटीपी काही क्षणात देतात आणि काही क्षणातच बँकेतून पैसे हडप केले जातात.
अनोळखी क्रमांकांवरून कॉल आल्यास...
अनेकदा अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास अनेकजण आपली माहिती देतात. आपल्या कुटुंबातील, परिचित व्यक्तीचा आपल्याकडे सेव्ह असलेला क्रमांक सोडून अशा अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यास त्यावर शहानिशा करूनच माहिती द्यावी, अन्यथा काहीही संभाषण करू नये.
फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?
- बँकेची कोणतीही माहिती बँक मोबाइलवरून मागत नसते. त्यामुळे कोणालाही ही माहिती देऊ नये.
- कोणत्याही क्रमांकावरून आलेली लिंक ओपन करू नये.
- अनोळखी व्यक्तीशी संभाषण करताना काळजी घ्यावी.
- ऑनलाइन माध्यमातून फसवणुकीचे नवनवीन प्रकार सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरावेळी काळजी घ्यावी.
वेगवेगळ्या पद्धतीने सध्या फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हे आणि त्यापासून बचावासाठी नागरिकांनी स्वत: सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे अनोळखी क्रमांकावर संवाद साधणे, त्यांना आपली कोणतीही माहिती देऊ नये. - संजय हारुगडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे