सांगली : ब्युटी पार्लरमध्ये क्लीनअप करण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या चेहऱ्यावर उकळते पाणी पडून ती गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी (दि. १३) घडली.याप्रकरणी पार्लर चालक नम्रता अविनाश मासाळ (रा. कुपवाड) यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियांका प्रवीण जाधव (वय २६, रा. लांडगेवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे जखमी तरुणीचे नाव आहे. त्यांनी नम्रता मासाळ यांच्याविरोधात तक्रार दिली.सांगलीत नेमीनाथनगरमध्ये कल्पद्रूम क्रीडांगण परिसरातील इन्फिनिटी पार्लरमध्ये प्रियांका क्लीनअपसाठी गेल्या होत्या. नम्रता यांनी स्टीम मशीनमध्ये पाणी उकळले. प्रियांका यांच्या चेहऱ्याला वाफ देताना निष्काळजीपणामुळे उकळलेले पाणी प्रियांका यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर पडले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १२५ (अ) नुसार गुन्हा मासाळ यांच्याविरोधात दाखल केला.
पार्लरमध्ये चेहऱ्यावर उकळते पाणी पडून तरुणी जखमी, सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:43 IST