Sangli: अनाथाश्रमातील मुलीचे स्थळ आहे असे सांगून लग्नाळू तरुणांची फसवणूक, देणगीच्या नावे पैसे उकळले
By संतोष भिसे | Updated: September 30, 2025 19:11 IST2025-09-30T19:11:07+5:302025-09-30T19:11:30+5:30
अनाथश्रमात चक्क स्थळ पाहण्यासाठी बोलविले!

Sangli: अनाथाश्रमातील मुलीचे स्थळ आहे असे सांगून लग्नाळू तरुणांची फसवणूक, देणगीच्या नावे पैसे उकळले
संतोष भिसे
सांगली : मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे ही समस्या गंभीर बनली आहे. याचा गैरफायदा घेऊन तरुणांच्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ‘लग्नासाठी अनाथाश्रमातील मुलीचे स्थळ जुळवून देतो’ असे सांगत फसवणुकीच्या घटना उजेडात आल्या आहेत. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन आश्रमाच्या संचालकांनी केले आहे.
लग्नासाठी मुलीचे स्थळ उपलब्ध असल्याचे सांगून फसवेगिरी झाल्याच्या तक्रारी खूपच मोठ्या प्रमाणात पोलिसांत सध्या येत आहेत. समाजमाध्यमातून विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ‘अनाथाश्रमातील मुलीचे स्थळ लग्नासाठी तयार आहे, फक्त प्रवेशाच्या गेटपाससाठी पैसे द्या’ असे सांगून पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत. अनाथश्रामातील मुलींच्या स्थळाचे संदेश खूपच मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमावर फिरविले जात आहेत. हे संदेश पाहून विवाहेच्छुक तरुण आणि त्याच्या कुटुंबातील लोकभावनेच्या भरात फसत आहेत.
सहानुभूतीच्या ओघात किंवा लग्नाची घाई असल्याने लगेच संंदेश देणाऱ्याशी संपर्क करतात. तेथेच फसवणुकीच्या साखळीत फसत जातात. ‘अनाथाश्रमातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील मुलींच्या लग्नासाठी स्थळ हवे आहे, घरचे कुणी नाही, त्यामुळे सरकारी संमतीने विवाह लावून दिला जाईल.’ अशा भूलथापा मारल्या जातात. स्वस्तात लग्न होण्याच्या आशेने अनेकजण या जाळ्यात फसतात. त्यानंतर मात्र पैशांची मागणी सुरू होते. ‘अनाथश्रमाला देणगी द्यावी लागेल, तेथे प्रवेशासाठी गेटपास किंवा प्रवेश शुल्क भरावे लागेल,’ अशी कारणे सांगितली जातात.
‘हे लग्न सरकारी परवानगीनेच होणार असल्याने पैशांची रीतसर पावती मिळेल,’ असेही सांगितले जाते. ही रक्कम ५००० रुपयांपासून १५ ते २० हजार रुपयांपर्यंतही आहेत. ‘पैसे मिळताच मुलीचा संपर्क क्रमांक, बायोडाटा, फोटो आणि भेटीची तारीख सांगितली जाईल,’ असेही सांगितले जाते. सांगली, मिरजेत अशा अनेकांच्या फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. यातील काहींना तर मुलीचा फोटो, नाव, वय, शिक्षण आदी बनावट माहितीही भामट्यांकडून देण्यात आली आहे. त्यांनी पैसे पाठविल्यानंतर मात्र त्या क्रमांकावरून संपर्क थांबला आहे.
अनाथश्रमात चक्क स्थळ पाहण्यासाठी बोलविले!
देशमुख नाव सांगणाऱ्या एका महिलेने काही लग्नाळू तरुणांची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे. अनाथाश्रमाच्या गेट पाससाठी ऑनलाइन पैसे घेतल्यानंतर तिने तरुणाच्या कुटुंबांना स्थळ पाहण्यासाठी मिरजेतील एका अनाथाश्रमात बोलविले. कुटुंबे अनाथाश्रमात पोहोचली, तेव्हा फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी कथित देशमुखबाईचा फोन बंद होता. शिवाय या संस्थेशी अशा कोणत्याही महिलेचा संबंध नसल्याचेही दिसून आले. अब्रू जाण्याच्या भीतीने या कुटुंबांनी फसवणुकीची वाच्यता केली नाही. मात्र, संस्थेने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. आता ही महिला चंद्रपूर जिल्ह्यातील एका अनाथाश्रमाच्या नावाने फसवणूक करीत असल्याचे दिसून आले आहे.
आमच्या संस्थेच्या नावाने एका महिलेने विवाहेच्छुक तरुणांची फसवणूक केल्याचे प्रकार आम्हाला समजले. त्यानंतर आम्ही मिरज पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. गरजू लोकांची फसवणूक करणे, त्यांच्याकडून पैसे उकळणे, खोटी स्थळे दाखविणे असे प्रकारही झाले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींपासून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. - डाॅ. सुधन्वा पाठक, विश्वस्त, पाठक ट्रस्ट तथा पाठक अनाथाश्रम, मिरज