Young generation should consolidate Marathi language: Suvarna Pawar | युवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे : सुवर्णा पवार

युवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे : सुवर्णा पवार

ठळक मुद्देयुवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे : सुवर्णा पवारमराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय येथे कार्यक्रम

सांगली : जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात युवा वर्ग आपल्या मायबोली मराठी साहित्यापासून काहीसा दुरावलेला दिसून येत आहे. साहित्य वाचन मागे पडले आहे. त्यामुळे लिखाणही मागे पडले आहे. वाचन, विचार, चिंतन साहित्यातून येते. आपल्या मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने वाचन, लेखन करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि साहित्यिका सुवर्णा पवार यांनी केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय सांगली येथे आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त एस. के. माळी, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

श्रीमती सुर्वणा पवार म्हणाल्या, लेखण करण्यासाठी वाचनाची सवय लागली पाहिजे. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी वाचन, लेखण अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक मुल्यांची जपणूक करायची असेल तर वाचन, लेखण केले पाहिजे. प्रत्येकामध्ये एक सुप्त साहित्यिक असतो. तो व्यक्त झाला पाहिजे. जर माणूस व्यक्त होत गेला तर वाचकही वाढतील, असेही त्या म्हणाल्या.

सहाय्यक आयुक्त एस. के. माळी म्हणाले, मराठी भाषा ही मुळातच सुसंस्कृत व विकसीत असून तिला फक्त प्रफुल्लीत व जिवंत ठेवण्याचे काम करावयाचे आहे. मराठी भाषेमध्ये सौंदर्य आहे ते टिकविण्यासाठी भाषेची चांगली जपणूक करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये जी भाषा बोलली जाते त्यामध्येही सौंदर्य आहे. त्यासाठी ग्रामीण भाषेचीही जपणूक करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मराठी भाषा संवर्धनाचे जनक कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी कार्यक्रमाचा हेतू विशद करून मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आभार सर्वसाधारण सहाय्यक शंकरराव पवार यांनी मानले. 

 

Web Title: Young generation should consolidate Marathi language: Suvarna Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.