सांगली रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटतंय!, आतापर्यंत झालेली अन् येत्या काळात होणारी कामे..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 19:11 IST2025-10-15T19:11:37+5:302025-10-15T19:11:49+5:30
अमृत भारत योजनेंतर्गत कामाला गती

सांगली रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटतंय!, आतापर्यंत झालेली अन् येत्या काळात होणारी कामे..जाणून घ्या
प्रसाद माळी
सांगली : मागील वर्षभरापासून अमृत भारत रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत सांगलीरेल्वे स्टेशनमध्ये विविध सुविधा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही दिवसात प्लॅटफॉर्म क्रमांक १ पासून ४ पर्यंतच्या प्लॅटफाॅर्मला जोडणाऱ्या पादचारी उड्डाणपुलाचे काम सुरू होईल. यासह सर्व प्लॅटफॉर्मवर लिफ्ट आणि रॅम्प सुविधा उभारली जाणार आहे. मार्च २०२६ अखेर योजनेंतर्गत रेल्वे स्टेशनचे अत्याधुनिकरण पूर्णत्वास येणार आहे.
सांगली रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाच्या कामास गती आली असून, विकासकामांचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. या आधी प्लॅटफाॅर्म क्रमांक १ वरील शेडची उभारणी झाली आहे. सध्या प्लॅटफाॅर्म क्रमांक २ व ३ वरील शेडचे काम सुरू आहे. हे पूर्ण होताच चौथ्या क्रमांकावरील शेडच्या कामास सुरुवात होईल. यासह काही दिवसातच प्लॅटफॉर्म १ पासून ४ पर्यंत सर्व प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या पादचारी उड्डाणपुलाचे काम सुरू होईल.
तसेच यासोबत लिफ्ट आणि रॅम्पची सुविधाही बनवली जाणार आहे. यासह सर्व श्रेणीसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय केली जाणार आहे. त्यामुळे सांगली स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांना अत्याधुनिक सोयी उपलब्ध होऊन प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
येत्या काळात होणारे काम
- प्लॅटफॉर्म १ पासून ४ पर्यंत जोडणारा पादचारी पूल बनवला जाणार.
- प्लॅटफॉर्म पादचारी पुलास लिफ्टची व रॅम्पची सोय उभारली जाणार.
- प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ वरील शेडचे काम सुरू आहे. तसेच ४ वरही शेडची उभारणी केली जाणार आहे.
- सर्व श्रेणीसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह व प्रसाधनगृहाची निर्मिती होणार आहे.
- मिरजेकडील बाजूस सर्व प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या आणखी एक पादचारी पूल असावा यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
आतापर्यंत झालेले काम
- प्लॅटफॉर्म क्रमांक १ चे संपूर्ण शेडचे काम पूर्ण झाले आहे.
- प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ ची रुंदी वाढवून १२ मीटर केली आहे.
- स्थानकाच्या मुख्य स्वागत कमान उभारण्यात आली आहे.
- सिग्नलिंग व रेल्वे विद्युतीकरण विभागासाठी नवीन इमारत उभारली आहे.
- रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था केली आहे.
अत्याधुनिक तिकीट आरक्षण केंद्र
स्टेशनची आणखी एक इमारत उभारली असून, यामध्ये अत्याधुनिक तिकीट आरक्षण केंद्र उभारले असून, ती कार्यान्वित करण्यात आली आहे.
तसेच नवीन चौकशी खिडकी सुरू केली आहे. यासह गाड्यांची माहिती देणारे नवीन वेळापत्रक फलक लावले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर तीन खाद्यपदार्थ स्टॉल प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर प्रशस्त विश्रांतीगृह व दिव्यांगांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह बनवले आहे.
नव्या माल गोदामाचे काम सुरू
रेल्वेच्या माल गोदामाच्या जागी विविध सुविधा देण्याचे काम सुरू आहे. माल गोदामाचे काम अमृत भारत योजनेंतर्गत येत नाही. तरी सांगली स्टेशनसाठी विशेष निधी मंजूर असून, त्यातून सुविधा दिल्या जात आहे. आधी एक गोदाम आहे, त्याच्या जोडीला दुसरे गोदाम उभारले जात आहे. मालवाहतूक वाहनांना सहज गोदामात माल उतरविता येण्यासाठी गोदामाच्या जवळच्या संपूर्ण भागाचे काँक्रिटीकरण केले आहे.
अमृत भारत रेल्वे स्टेशन पुनर्विकास योजनेंतर्गत सांगली स्टेशनच्या आधुनिकीकरणाचे काम गतीने सुरू आहे. येत्या मार्च अखेर सर्व काम पूर्णत्वास येईल. यामुळे अत्याधुनिक अशा रेल्वेस्थानकाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. - सरोज कुमार, सहायक मंडल अभियंता, मध्य रेल्वे, मिरज.