‘अलमट्टी’च्या उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू - सर्जेराव पाटील 

By अशोक डोंबाळे | Updated: December 20, 2024 18:51 IST2024-12-20T18:50:54+5:302024-12-20T18:51:17+5:30

उंची वाढविल्याचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना सर्वाधिक फटका

Will file a petition in the Supreme Court against increasing the height of Almatti dam says Sarjerao Patil | ‘अलमट्टी’च्या उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू - सर्जेराव पाटील 

‘अलमट्टी’च्या उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू - सर्जेराव पाटील 

सांगली : अलमट्टी धरणाची उंची वाढवून पाणी पातळी ५२४.२५६ करण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या निर्णयाचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार असल्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा धोका वाढणार आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला सांगलीच्या कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने विरोध दर्शवला आहे. सध्या अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला फटका बसत आहे.

जर पुन्हा कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास याची व्याप्ती आणखी वाढून थेट कऱ्हाडपर्यंत आणि कोल्हापूरच्या शिरोळबरोबर कर्नाटकच्या चिकोडीपर्यंत सगळे बुडण्याचा धोका आहे. कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार याचिका दाखल करणार नसेल तर कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आताच पूर, उंची वाढविल्यास महापूर

सध्या अलमट्टी धरणाची उंची ५१९.६० मीटर इतकी आहे. सध्याच्या उंचीमुळे सांगलीपर्यंत बॅकवॉटर पूर येत आहे. कोल्हापूरच्या नरसोबावाडीपर्यंत फुग निर्माण होते. २००५, २०१९ आणि २०२१ मध्ये अलमट्टीचे बॅकवॉटर सांगली-कोल्हापूरच्या पुराला कारणीभूत असल्याचं समोर आलं होतं. आता अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. ५२४.६८ मीटर इतकी उंची करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापूर कायमचा असेल, असे मत प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले.

चार जिल्ह्यांना फटका

सांगली, सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याला कृष्णेच्या महापुराचा फटका बसू शकतो. सांगलीच्या पलूसपर्यंतचा बॅक वॉटर, सातारच्या कऱ्हाडपर्यंत जाण्याची शक्यता. कोल्हापूरच्या नरसोबावाडीपासून शिरोळ तालुक्यातील अनेक गाव महापुरात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला देखील अधिकचा फटका बसण्याची शक्यता आहे. चिक्कोडीपर्यंत अलमट्टी धरणाच्या पाण्याचे बॅकवॉटर जाऊ शकते, अशी भीती देखील प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केली.

Web Title: Will file a petition in the Supreme Court against increasing the height of Almatti dam says Sarjerao Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.