Sangli: पार्टेवाडीत शेतकऱ्यावर रानगव्याचा जीवघेणा हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:18 IST2025-12-30T17:17:21+5:302025-12-30T17:18:02+5:30
वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात

Sangli: पार्टेवाडीत शेतकऱ्यावर रानगव्याचा जीवघेणा हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
वारणावाती : चांदोली राष्ट्रीय उद्यानालगतच्या शिराळे-वारुण परिसरात पुन्हा एकदा रानगव्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला असून, पार्टेवाडी येथे शेतकऱ्यावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पार्टेवाडी (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी शिवाजी मारुती चिंचोलकर (वय ४५) हे आज सकाळी सुमारे ११ वाजता आपल्या शेताकडे गेले असता, झुडपाआड दबा धरून बसलेल्या रानगव्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. गव्याच्या जोरदार धडकेत चिंचोलकर जमिनीवर कोसळले. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर खोल जखम झाली असून, पोटातील आतडी बाहेर येईपर्यंत गंभीर इजा झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्र, शित्तूर येथील वैद्यकीय अधिकारी व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी चिंचोलकर यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
वन विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात
चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरात गेल्या दोन वर्षांत हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, याच गावातील मयूर यादव या तरुणावर वर्षभरापूर्वी रानगव्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले होते. आजच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, परिसरात गस्त वाढवावी व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी आहे.