एमडी ड्रग्ज प्रकरण; सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का?, तस्करीचा ‘आका’ कोण?

By हणमंत पाटील | Updated: February 3, 2025 15:44 IST2025-02-03T15:44:18+5:302025-02-03T15:44:18+5:30

नव्या पिढीचे भवितव्य अंधारात 

Why is the people's representative silent in the case of MD drugs in Sangli district | एमडी ड्रग्ज प्रकरण; सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का?, तस्करीचा ‘आका’ कोण?

एमडी ड्रग्ज प्रकरण; सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का?, तस्करीचा ‘आका’ कोण?

हणमंत पाटील

सांगली : गेल्या आठवड्यात मिरजेत नशेच्या इंजेक्शनचा साठा पकडला, त्यांनतर कार्वे-विटा ‘एमआयडीसी’मध्ये एमडी ड्रग्जचा कारखाना सापडला. ५० रुपायांच्या मोबाइल स्क्रीन गार्डसाठी नशेत खून होतो, तरीही सांगलीचा एकाही लोकप्रतिनिधी, विशेषत: युवा खासदार व आमदार या गंभीर विषयावर एक चक्कार शब्द न बोलता गप्प का आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य सांगलीकरांना पडला आहे.

नव्या पिढीचे भवितव्य पोखरणारा व त्यांना नशेबाज बनविण्याचा कारखाना शासनाच्या एमआयडीसीच्या अधिकृत जागेत राजरोसपणे सुरू होता. मात्र, त्याचा पत्ता इथली पोलिस यंत्रणा, एमआयडीसी अधिकारी व प्रशासनाला लागला नाही. मात्र, सांगली गुन्हे अन्वेषण विभागाला त्याची कुणकुण लागल्याने त्यांनी कारखान्यातील ड्रग्ज मुंबईला घेऊन जाताना तीन आरोपींना ताब्यात घेतले. मुंबईच्या जेलमध्ये गुजरात व मुंबईच्या ड्रग्ज तस्करांची विटयातील एका सराईत गुन्हेगाराशी ओळख झाली. सांगलीतील विट्यात एमआयडीसीची जागा एमडी ड्रग्ज उत्पादनासाठी सुरक्षित वाटणे, हेच इथल्या राजकीय लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे अपयश आहे.

त्याला पार्श्वभूमी ही तशीच आहे, कारण गेल्या वर्षभरात सांगली जिल्ह्यातील चार ठिकाणी ड्रग्जचे उत्पादन व तस्करी आढळून आली आहेत. गेल्या वर्षभरात ड्रग्जचा साठा पकडण्याची पहिली कारवाई कुपवाड, त्यानंतर इरळी (ता. कवठेमहांकाळ) व मांजर्डे (ता. तासगाव) येथे झाली. त्यानंतरही ड्रग्ज तस्करांना सांगली जिल्हा सुरक्षित वाटतो. त्यामुळेच शासनाच्या विटा एमआयडीसीच्या जागेत एमडी ड्रग्ज कारखाना राजरोसपणे उभारण्याचे धाडस गुन्हेगार व तस्करांचे वाढत चाललेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भावी पिढीचे भवितव्य उद्धवस्त होऊ शकते. मात्र, त्याचे भान इथल्या लोकप्रतिनिधींना नसणे, हे सांगलीकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करीचा ‘आका’ कोण ?

सांगली जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, पतंगराव कदम, मदन पाटील, आर. आर. पाटील ते अनिल बाबर अशी मोठी राजकीय परंपरा आहे. या काळात त्यांचा प्रशासनावर वचक होता. त्याकाळात सांगली जिल्ह्यात सक्षम अधिकारी असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण होते. मात्र, जिल्ह्यात मागील काही वर्षात लोकप्रतिनिधी व प्रशासनावर दबाव ठेवणाऱ्या तिसऱ्या शक्तीचा उदय होऊ लागला आहे. त्यामुळे सांगलीत बीड जिल्ह्याप्रमाणे नवा ‘आका’ निर्माण होऊ नये, याची दक्षता आता सांगलीकरांनाच घ्यावी लागणार आहे.

ड्रग्ज तस्कर अन् गुन्हेगारांची पंढरी..

नाट्य, संगीत, शिक्षण, हळद व द्राक्ष उत्पादनाचे माहेरघर व पंढरी अशी सांगलीची जगभर ओळख आहे. त्यासाठी योगदान देणारे इथले ज्येष्ठ कलाकार विष्णुदास भावे, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ते आर. आर. पाटील अशी सांगलीची उज्ज्वल परंपरा आहे. हेच सांगली गेल्या काही वर्षांत गुन्हेगार व ड्रग्ज तस्करांना सेफ वाटू लागले. त्यामुळे भविष्यात सांगली गुन्हेगारांची पंढरी म्हणून ओळखली जाण्याची भीती वाटू लागली आहे. तरीही इथले युवा पिढीतील राजकीय वारसदार असलेले खासदार व आमदार या गंभीर विषयावर ‘मूग गिळून गप्प’ असल्याबद्दल आश्चर्य वाटत आहे.

Web Title: Why is the people's representative silent in the case of MD drugs in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.