सांगली : आम्हालाही शिव्या येतात, पण महाराष्ट्र शिव्यांसमोर नाही, तर विकासाच्या ओव्यांसमोर नतमस्तक होतो. वाचाळवीरांमुळे भाजपची प्रतीमा डागाळत आहे. गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी कोण, असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.सांगलीत सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. खासदार निलेश लंके म्हणाले, वाचाळवीरांचा आका जाती-जातीत भांडणे लावून देत आहे. त्यालाच धडा शिकविला पाहिजे. त्यांच्याकडे राज्याला देण्यासाठी काहीही नाही. समज देण्याऐवजी ताकीद द्या. भविष्यात हा संघर्ष तुमच्यावरच उलटेल.राजेश टोपे म्हणाले, राज्यात कंबरेखालील राजकारण सुरु आहे. चांगला माणूस राजकारणात येण्यास तयार नाही. सगळ्यांनीच आपापल्या कार्यकर्त्यांना आवरले पाहिजे. पडळकर यांना मुख्यमंत्र्यांनी शिक्षा दिली पाहिजे.यावेळी आमदार उत्तम जानकर, दिलीप पाटील, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, मनोज शिंदे - म्हैसाळकर, सुकुमार कांबळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, देवराज पाटील, संजय बजाज, रिपाईचे सचिन खरात उपस्थित होते.टीआरपीसाठी नेते काहीही बोलतातआमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, टीआरपीसाठी कोणीतरी काही बोलत असेल तर ते चुकीचे आहे. राजकीय पोळी कोणी भाजत असेल तर त्याला बळी पडू नका.
... म्हणून मी ओरडलोआव्हाड यांनी यावेळी विधानभवन आवारातील घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, मला उद्देशून चुकीचा आवाज आला, त्यामुळे माझा तोल सुटला. मी ओरडलो. पण कोणाचेही नाव घेतले नव्हते. मग संबंधित नेत्याला राग का आला? दुसऱ्या दिवशी त्यांनी अंगावर गाडी घातली. त्यातून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख बचावले. भाजपने अशी माणसे विधानसभेत आणून ठेवली आहेत.
वडार की कहानी छुपानी है..आव्हाड म्हणाले, ‘अवधूत वडार यांचे प्रकरण लपवायचे असल्याने जयंत पाटील यांच्याविषयीचे हे प्रकरण तयार केले गेले. पडळकरवाडीच्या आजीच्या १८ एकर जमिनीच्या चौकशीसाठी समितीचे आश्वासन विधानसभेच्या अध्यक्षांनी दिले होते, त्याचे पुढे काहीही झाले नाही. इतक्या प्रकारानंतरही अजित पवार, एकनाथ शिंदे गप्प कसे आहेत? यातून तुमचीच बदनामी होत आहे.
बेन्टेक्स कार्यकर्ता बोलतोरोहित पवार म्हणाले, सोन्यासारख्या माणसाबद्दल बेन्टेक्स कार्यकर्ता बोलतो. असे वाद जाणीवपूर्वक निर्माण केले जातात. मराठा आरक्षणाचा वाद केंद्र व राज्याच्या नेत्यांनी एकत्र बसून संपवावा. निवडणुकांच्या तोंडावर शाकाहारी विरुद्ध मांसाहारी, मराठाविरुद्ध अन्य अशी भांडणे पेटविण्याचा उद्योग सुरू आहे. अशाने निवडून येता येते हे त्यांना माहिती आहे.
कोण काय म्हणाले?- सक्षणा सलगर : पडळकर जे बोलले ते भाजपला मान्य आहे का? जयंत पाटील यांचा विरोधकही खानदानी पाहिजे.- आमदार उत्तम जानकर : आजचा मोर्चा आणि सभा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले बंड आहे. मारकडवाडीसोबतच जतचेही मतदान, पण एकदा मतपत्रिकेवर घेऊन पाहू.- माजी आमदार विक्रम सावंत : गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा भाजप नेते निषेध करताना दिसत नाहीत. अभियंता अवधूत वडार यांच्या आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे.- युवक राष्ट्रवादी अध्यक्ष मेहबूब शेख : आमच्या बीडपेक्षा बदनाम अवस्था सांगलीत आहे. आमच्याकडे आमदारामुळे कोणी अभियंत्याने आत्महत्या केलेली नाही. पडळकर यांचा सांगली, कोल्हापूरमधील हॉटेलांमधील डेटा काढण्याची वेळ येऊ नये.- दिलीप पाटील : 'गोपीचंद पडळकर यांचा बंदोबस्त करू' असे माझे कार्यकर्ते म्हणत होते, पण जयंत पाटील यांचे नाव येईल म्हणून 'नको' म्हटले.