Sangli ZP Election: पक्ष विचारमंथनात, इच्छुक उतरले थेट रिंगणात; तिकिटवाटपापूर्वीच उमेदवारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:00 IST2026-01-20T17:58:59+5:302026-01-20T18:00:28+5:30
दोन दिवस उरले तरी युती-आघाड्या अनिश्चित

Sangli ZP Election: पक्ष विचारमंथनात, इच्छुक उतरले थेट रिंगणात; तिकिटवाटपापूर्वीच उमेदवारी दाखल
सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष विचारमंथनात असताना इच्छुकांनी मात्र आघाडी घेतली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीच इच्छुकांनी आपापल्या पक्षांच्या चिन्हांसह मिरवणुका काढायला सुरुवात केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारपर्यंतचा दोनच दिवसांचा कालावधी उरला आहे. राजकीय पक्षांच्या स्तरावर अद्याप मुलाखती आणि आढावा बैठकाच सुरू आहेत. तब्बल पावणेनऊ वर्षांनी निवडणुका होत असल्याने इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे त्यांनी पक्षाचे निर्णय होण्यापूर्वीच उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
सोमवारी मिरज, खानापूरसह काही तालुक्यांत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. इच्छुकांनी गावातूनच मिरवणुका काढत शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे आपण निवडणूक लढवू इच्छित असलेल्या पक्षाच्या चिन्हासह मिरवणुका काढल्या. खानापूर तालुक्यातून पहिला अर्ज दाखल झाला.
निवडणुका लांबल्याने इच्छुकांची संख्या खूपच मोठी आहे. या भाऊगर्दीत अगोदरच चिन्हासह मिरवणुका काढून शक्तिप्रदर्शन करण्यातून पक्षाच्या उमेदवारीची दावेदारी भक्कम करण्याचा इच्छुकांचा प्रयत्न दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून हे इच्छुक तयारी करत होते, पण निवडणूक अपेक्षेपेक्षा सतत लांबत गेल्याने त्यांच्या तयारीवर पाणी फिरत राहिले.
आता प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्याने त्यांचा उत्साह अनावर आहे. त्यामुळेच काँग्रेस, भाजपसह राष्ट्रवादीच्या मुलाखती व कार्यकर्ता मेळाव्यांना मोठी गर्दी होत आहे. सांगलीत रविवारी काँग्रेसच्या बैठकीला मिरज तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. भाजपच्या दोन दिवसांच्या मुलाखतींसाठी सुमारे ९०० इच्छुक हजर होते.
पहिल्या टप्प्यात अर्जच नाहीत
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात झाली, पण सोमवारपर्यंत अत्यल्प अर्ज दाखल झाले. नेलेल्या अर्जांची संख्या मात्र हजारावर होती. पक्षांची अधिकृत उमेदवारी, युती-आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का? याविषयी अनिश्चितता असल्याने इच्छुकांनीही ‘ठंडा करके खाओ’ अशी भूमिका घेतली.