सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग

By अशोक डोंबाळे | Published: April 12, 2024 06:24 PM2024-04-12T18:24:20+5:302024-04-12T18:24:44+5:30

संतप्त शेतकऱ्यांचा राज्यकर्त्यांना सवाल

When will leaders of Sangli district talk about fodder and water, Question of the public | सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग

सांगली जिल्ह्यातील नेत्यांनो, चारा-पाण्यावर कधी बोलणार?; सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार प्रचारात दंग

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल महिन्यातच ७७ गावे, ५६६ वाड्यांना ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पशुधन जगविण्यासाठी चाराही अपुरा पडत आहे. या गंभीर समस्या असतानाही उमेदवार आणि नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. सामान्यांच्या हिताच्या चारा, पाण्यावर कोणीच बोलत नाही. केवळ शेतकरी पुत्र आणि शेतकरी मित्र असाच कळवळा दाखवला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार? असा सवाल सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे.

जिल्ह्यात ७३४ गावे असून, लोकसंख्याही ३० लाखांच्या जवळपास आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील ८३ छोट्या-मोठ्या प्रकल्पांपैकी २२ प्रकल्प कोरडे पडले आहेत. सद्य:स्थितीत जलस्त्रोतांमध्ये केवळ २० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ७७ गावे आणि ५६६ वाड्यांवर एप्रिलमध्येच ८४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल पूर्ण महिना आणि मे पूर्ण महिना कसा जाणार?, याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वांनाच लागली आहे.

पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. चारा नसल्याने बाजारांत पशुधन कवडीमोल भावात विक्री केले जात आहेत. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो-तो आपला प्रचार करण्यातच व्यस्त असल्याचे चित्र आहे.

चाराटंचाईने पुशधनाची उपासमारी

मान्सून आणि परतीचा मान्सून पाऊस न झाल्यामुळे खरीप आणि रब्बी पेरणीच दुष्काळी तालुक्यात झाली नाही. परिणामी, पशुधनासाठी चाराच उपलब्ध नाही. त्यामुळे पशुपालक कडब्याच्या एका पेंढीला १५ ते १९ रुपये मोजत आहे. दिवसाला एका पशुधनास किमान पाच ते सहा पेंढ्यांची गरज आहे. दिवसाचा खर्च पशुधनाचा १०० रुपयांवर चालल्यामुळे शेतकरी कवडीमोल किमतीला पशुधन विक्री करू लागले आहेत. ओला चारा नसल्यामुळे दुभत्या पशुधनाचे हाल होत आहेत.

खासगी विहिरी, बोअर अधिग्रहण

तालुका - संख्या
जत - ३४
क.महांकाळ - १
खानापूर - ४
आटपाडी - २

दोन लाखांवर लोकसंख्येला टंचाईची झळ

जिल्ह्यातील ८३ गावे आणि ५६६ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाखांवर लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईची झळ पोहोचली आहे. ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय जत तालुक्यातील शिंगणापूर, वज्रवाड, कोणबगी, कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी, खानापूर तालुक्यातील कुर्ली-घाडगेवाडी, रेवणगाव, घोटी खुर्द या गावांतही पाणीटंचाई निर्माण झाली असून, भविष्यात टँकर लावावे लागणार आहेत.

प्रशासन म्हणतेय, ३० दिवस पुरेल चारा..

  • जत तालुक्यातील लहान, मोठे, शेळी, मेंढ्यांना ३० दिवस पुरेल एवढा चारा आहे. लहान जनावरांसाठी प्रतिदिन तीन किलो, तर मोठ्यांसाठी सहा किलो चारा लागतो.
  • प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात चाऱ्याची उपलब्धता मुबलक आहे. अजूनही दोन महिने पुरेल एवढा चारा आहे.
  • असे असले तरी प्रत्यक्षात आजही काही भागांत चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.
  • डोंगराळ भाग, रिकाम्या शेतीमध्ये चरायला सोडून पशुधनांचे पोट भरले जात आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: When will leaders of Sangli district talk about fodder and water, Question of the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.