Sangli news: म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचा पाणीउपसा थांबवला, शेतकरी चिंतेत
By संतोष भिसे | Updated: July 3, 2023 14:12 IST2023-07-03T14:12:13+5:302023-07-03T14:12:59+5:30
पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात

Sangli news: म्हैसाळ सिंचन प्रकल्पाचा पाणीउपसा थांबवला, शेतकरी चिंतेत
सांगली : म्हैसाळ प्रकल्पातून गेले पाच महिने सुरु असलेला पाणीउपसा अखेर थांबविण्यात आला. कोयना धरणात आणि कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने पंप बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
गेल्या महिन्याभरापासून कृष्णेत पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. सध्या पाणी आले असले, तरी ते पिण्यापुरतेच आहे. त्यामुळे सिंचनासाठीच्या उपशावर पाटबंधारे विभागाने काहीवेळा निर्बंध लादले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठपुराव्यानंतर उपसाबंदी उठवण्यात आली, पण नदीत पाणीच नसल्याने म्हैसाळ प्रकल्पाचे पंप बंद करावे लागले.
कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या मिरज, कवठेमहांकाळ किंवा तासगाव तालुक्यातून पाण्याची मागणी नव्हती. जतमध्ये पाणीपुरवठा सुरु होता, पण नदीत पाणी नसल्याने उपशावर मर्यादा येत होत्या. पहिल्या तीन पंपगृहांमध्ये दोन किंवा तीनच पंप सुरु ठेवता येत होते. जतला पाणी देण्यासाठी पहिल्या दोन पंपगृहांत १५ ते १८ पंप सुरु ठेवणे आवश्यक ठरते. पण नदीत पाणी नसल्याने पंपांची संख्या वाढवता आली नाही. परिणाम चार दिवसांपूर्वी उपसा पूर्णत: बंद करण्यात आला.
सध्या प्रकल्पाचा मुख्य कालवा कोरडा पडला आहे. या चारही तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. तलाव, ओढे-नाले कोरडेच आहेत. या स्थितीत प्रकल्पाच्या पाण्याचा शेतकऱ्यांना आधार मिळत होता.
पूराचे पाणी दुष्काळी पट्ट्यात
२० जानेवारीरोजी उपसा सुरु केला होता. तब्बल पाच महिने आवर्तन सुरु राहिले. आता जानेवारीमध्ये पुढील आवर्तन सुरु होण्याची शक्यता आहे. पण धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यास पुराचे संकट टाळण्यासाठी ऐन पावसाळ्यात उपसा पुन्हा सुरु केला जाऊ शकतो. हे पाणी दुष्काळी पट्ट्याला पुरवले जाईल.