सांगलीत ऐन दिवाळीत पाणीबाणी; फटाके बाजूला टाकले, बादल्या घेवून आंदोलनाला आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 16:10 IST2025-10-21T16:10:16+5:302025-10-21T16:10:48+5:30
अभ्यंगस्नानादिवशीच नळ पडले कोरडे, बादली, घागर घेऊन ठिय्या

छाया-नंदकिशोर वाघमारे
सांगली : गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून ऐन दिवाळीदिवशीच नळ कोरडे पडले होते. गावभाग, शामरावनगर, गणेशनगर, खणभागसह निम्म्याहून अधिक शहराला सोमवारी पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिक व माजी नगरसेवकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्याला घेराव घातला. पाणीपुरवठा कार्यालयासमोर बादली, घागर घेऊन ठिय्या मारत जाबही विचारला. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळेच सणाच्या काळात पाणीबाणी निर्माण झाल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
सांगली शहरात पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. गेल्या महिनाभरापासून शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारीही केल्या; पण त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. आता अभ्यंगस्नानाच्या दिवशीच शहरातील नळ कोरडे पडले होते. गावभागात सकाळी पाणी न आल्याने नागरिक रस्त्यावर उतरले होते. माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चिदानंद कुरणे व मनराज साळुंखे यांना वॉर्डातच घेराव घातला. यावेळी महिलांनी महापालिका अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. एक दिवस पाणी बिल भरले नाही तर कनेक्शन तोडले जाते. आता सणासुदीत पाणी मिळत नाही. मग आम्ही बिले कशासाठी भरायची? असा सवालही केला.
तर खणभाग, गणेशनगरसह प्रभाग १५ व १६ मधील नागरिकांनी थेट हिराबाग वाॅटर वर्क्सचे कार्यालय गाठले. माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, मयूर पाटील, उत्तम साखळकर, तौफिक शिकलगार, सुजित राऊत यांच्यासह नागरिकांनी बादली, घागर घेऊन पाणीपुरवठा कार्यालयासमोर ठिय्या मारला. यावेळी अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
व्हाॅल्व्ह नादुरुस्त
हिराबाग येथील जुन्या टाकीच्या ७०० मिमी आऊटलेट मेन लाईनवरील व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे खणभाग, गावभाग, वखारभाग, गणेशनगर, सिद्धार्थ परिसरात पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने झाला. व्हाॅल्व्हच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर नियमित पाणीपुरवठा होईल. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.
टँकरने पाणीपुरवठा
दुथडी भरून वाहणारी कृष्णा नदी, पाऊसमानही चांगले, तरीही शहराला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याविरोधात नागरिकांतून संताप व्यक्त होताच महापालिकेने पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली. दिवसभरात गावभाग, गणेशनगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.