विश्वजित कदम यांचे शक्तिप्रदर्शन -: पलूस-कडेगावमधून अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 23:15 IST2019-10-04T23:14:53+5:302019-10-04T23:15:58+5:30

‘विश्वजित कदम आगे बढो...’ अशी घोषणा देत कार्यकर्ते प्रचंड उत्साहाच्या वातावरणात रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. या सभेला जोरदार गर्दी करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

Vishwajit Kadam's show of strength | विश्वजित कदम यांचे शक्तिप्रदर्शन -: पलूस-कडेगावमधून अर्ज दाखल

कडेगाव शहरात आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या गर्दीने तेथील आजवरचे ‘रेकॉर्ड’ तोडले.

ठळक मुद्दे कडेगावात मोटारसायकल रॅली; मोहरम चौकात सभा; गर्दीचे सर्व विक्रम मोडले

कडेगाव : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी दुचाकी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
कडेगाव येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. यावेळी आमदार मोहनराव कदम, स्वाभिमानी शेतकरीचे अध्यक्ष राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब यादव, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, इंद्रजित साळुंखे उपस्थित होते.

विश्वजित कदम यांनी सकाळी डोंगराईदेवी, सोनसळ येथील चौरंगीनाथ व उदगिरीदेवी, हणमंतनगर (चिंचणी) येथील हनुमान व सिध्दनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर सागरेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी देवराष्ट्रे येथे यशवंतराव चव्हाण यांच्या व चिंचणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे डॉ. विश्वजित कदम, त्यांच्या पत्नी स्वप्नाली कदम व कदम कुटुंबियांनी दर्शन घेतले.

यानंतर रॅलीची सुरुवात झाली. पुढे उघड्या जीपमधून विश्वजित कदम मतदारांना अभिवादन करत होते. जीपमध्ये त्यांच्यासमवेत डॉ. जितेश कदम होते. त्यामागे रॅली होती. सोनहिरा कारखाना, वांगी, हिंगणगाव खुर्द, कडेपूरमार्गे रॅली कडेगाव मोहरम चौकात आली. तिथून तहसील कार्यालयात जाऊन विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोहरम चौकात सभा झाली. या सभेला जोरदार गर्दी करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, डोक्यावर काँग्रेसच्या टोप्या, गळ्यात हाताच्या चिन्हांची पट्टी, हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन, ‘विश्वजित कदम आगे बढो...’ अशी घोषणा देत कार्यकर्ते प्रचंड उत्साहाच्या वातावरणात रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले.

अश्रू अनावर
विश्वजित कदम यांनी सोनहिरा कारखाना येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यावेळी वडिलांच्या आठवणीने विश्वजित कदम भावनावश झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांची ही अवस्था पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. वातावरण भावूक बनले.
 

Web Title: Vishwajit Kadam's show of strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.