वाळवा तालुक्यात आता प्रशासनाची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:50+5:302021-06-26T04:19:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वाळवा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. ...

वाळवा तालुक्यात आता प्रशासनाची धडक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वाळवा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तालुका प्रशासनाला कारवाईची धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलीस, महसूल, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील दक्षता समित्यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, सध्या तालुक्यात कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे होणाऱ्या नियमबाह्य गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इस्लामपूर आणि आष्टा या शहरातही कारवाया वाढविण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दोन्ही शहरात चार पथकांची निर्मिती केली आहे. तालुक्यामध्ये १ एप्रिलपासून विनामास्क फिरणाऱ्या २९७२ जणांकडून १३ लाख ४६ हजार, मोटार वाहन अधिनियमाखाली ६२१३ वाहनधारकांकडून १६ लाख ८२ हजार, तर विनापरवाना दुकाने सुरू ठेवणाऱ्या १६६ जणांकडून १ लाख ६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोविड साथ नियमावलीचा भंग केल्याबद्दल २२२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात दक्षता समितीकडून १५ हजार रुपये दंड वसूल झाला आहे.
चाचण्या वाढवल्या
तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ५२ गावांमध्ये कक्ष करण्यात आले आहेत. कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवून आता दिवसाला सरासरी १३०० व्यक्तींच्या अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या घेतल्या जात असल्याचे सबनीस यांनी स्पष्ट केले.