दोन वर्षांच्या बालकाचा हौदामध्ये बुडून मृत्यू, सांगलीतील जत तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:24 IST2025-07-26T15:23:37+5:302025-07-26T15:24:12+5:30

तालुक्यातील दुसरी घटना

Two year old boy drowns in a well incident in Jat taluka of Sangli | दोन वर्षांच्या बालकाचा हौदामध्ये बुडून मृत्यू, सांगलीतील जत तालुक्यातील घटना

दोन वर्षांच्या बालकाचा हौदामध्ये बुडून मृत्यू, सांगलीतील जत तालुक्यातील घटना

जत : तिपेहळ्ळी (ता. जत) घराजवळ खेळत असताना पाणीसाठ्यासाठी बांधलेल्या हौदात बुडून निशांत निलेश शिंदे (वय २ वर्षे) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी, दि. २५ रोजी सायंकाळी उघडकीस आली. निशांत याच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवारी दुपारी निशांत हा घरासमोर खेळत असताना अचानक तोल गेल्याने तो पाण्याने भरलेल्या हौदात पडला. त्या वेळी घरातील पुरुष कामानिमित्त बाहेर गेले होते. तर महिला घरकामात व्यस्त होत्या. त्यामुळे निशांत पाण्यात पडल्याची कोणालाही कल्पना आली नाही. काही वेळानंतर तो न दिसल्यामुळे त्याच्या नावाने हाका मारण्यास सुरुवात केली. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नातेवाईक सर्वत्र शोध घेऊ लागले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निशांत कोणाला दिसून आला नाही. 

पुन्हा शोध घेत असताना घराशेजारील हौदात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याला पाण्यातून काढून तत्काळ जत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. निशांत याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

जत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर निशांतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

तालुक्यातील दुसरी दुर्दैवी घटना

जाडरबोबलाद (ता. जत) येथे घरासमोर बांधकामाला पाणी साठवून ठेवण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून श्रवण महेश चनगोंड या सव्वा वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सोमवारी दि. १४ रोजी घटना घडली होती. त्यानंतर दहा दिवसात तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे.

Web Title: Two year old boy drowns in a well incident in Jat taluka of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.