Sangli Crime: शिवीगाळ केल्याचा राग, दोघांकडून मित्राचा निर्घृण खून
By घनशाम नवाथे | Updated: November 10, 2025 13:05 IST2025-11-10T13:04:25+5:302025-11-10T13:05:05+5:30
सांगलीत पोलिस चौकीजवळील तबेल्यात घडला प्रकार

Sangli Crime: शिवीगाळ केल्याचा राग, दोघांकडून मित्राचा निर्घृण खून
सांगली : अश्लिल शिवीगाळ केल्याच्या रागातून अमीर रावसाहेब कन्नुरे (वय ३३, रा. हनुमाननगर, पहिली गल्ली, सांगली) याचा दोघा मित्रांनी एडक्यासारख्या धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून केला. आपटा पोलिस चौकीसमोरील जमील कुरणे यांच्या घोड्याच्या तबेल्यात रविवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला. खुनानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवून हल्लेखोर मलिक ऊर्फ मलक्या दस्तगीर मुलाणी (वय २८, रा. वखारभाग), निशांत भिमसेन दासुद (वय २०, रा. ईगल पाईपजवळ, काळीखण) या दोघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, अमीर कन्नुरे हा हनुमाननगर येथील असून गेल्या पाच-सहा वर्षापासून कुरणे यांच्या तबेल्यात झोपायला असायचा. तेथील किरकोळ कामे करत होता. तर हनुमाननगरमध्ये त्याची आई आणि भाऊ राहतात. अमीर याला दारूचे व्यसन होते. संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते. तिघांना दारूचे व्यसन असल्यामुळे तिघेजण बऱ्याचदा एकत्र दारू पित होते. अमीर आणि संशयित मलिक, निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते. तेव्हा अमीर याने त्यांना अश्लिल शिवीगाळ केली होती. त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता. याच रागाच्या भरातून दोघांनी अमीरचा काटा काढायचे ठरवले.
रात्री अकराच्या सुमारास अमीर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला. तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा त्याच्या मित्रांसोबत तबेल्याच्या बाहेर गप्पा मारत बसला होता. काहीवेळाने मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला. काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफीससमोरील बोळात तो गेला.
दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण अमीरचा काटा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही अंतरावर थांबलेले होते. नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचे पाहून दोघेजण आतमध्ये आले. अमीर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता. त्यांनी आत आल्यानंतर अमीरच्या तोंडावर एडक्यासारख्या हत्याराने वार केले. तोंडावर, डोक्यावर, नाकावर आणि हनुवटीवर सात वार झाल्यानंतर दोघेजण बाहेर पडले.
तेवढ्यात नितीन हा लघुशंका करून तबेल्यात परतत होता. त्याला दोघेजण पळून जाताना दिसले. त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुचाकी सोडून तो पळाला. नितीन पळत तबेल्यात आला. तेव्हा अमीरवर हल्ला झाल्याचे दिसून आले. त्याने तत्काळ कुरणे यांना कळवले. जखमी अमीर याला तत्काळ सिव्हीलमध्ये हलवले. परंतू स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतानाच तो मृत झाला.
कुरणे यांनी विश्रामबाग पोलिसांना हा प्रकार कळवला. तत्काळ पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव घटनास्थळी आले. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संशयित दोघांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनीही भेट दिली. पोलिस पथकाने तत्काळ शोध मोहिम राबवली. मलिक याला घरातच ताब्यात घेतले. तर निशांत याला स्टेशन रस्त्यावरील मॉलच्या परिसरात ताब्यात घेतले. दोघांनी खुनाची कबुली दिली.