Sangli: मांस खाण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळीने केली मोरांची शिकार, ग्रामस्थांनी पकडले; सहा जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 12:47 IST2025-11-03T12:46:43+5:302025-11-03T12:47:01+5:30
ही टोळी शिकार करत असल्याचा संशय गावातील लोकांना आठ दिवसांपूर्वीच आला होता

Sangli: मांस खाण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या टोळीने केली मोरांची शिकार, ग्रामस्थांनी पकडले; सहा जणांवर गुन्हा दाखल
हातनूर : हातनूर (ता. तासगाव) येथे शनिवारी रात्री ऊसतोड करणाऱ्या मजुरांच्या टोळीने मांस खाण्यासाठी दोन मोरांची शिकार केल्याचा प्रकार घडला. ग्रामस्थांनी त्यांना घेरून ताब्यात घेत वनविभाग व पोलिसांच्या ताब्यात दिले.
वामन लक्ष्मण जाधव (वय ३६, रा. कुंभार्डा, ता. महाड), रत्नाकर अर्जुन पवार (वय ३९, रा. अंबवली), किशोर काशिराम पवार (वय २२, रा. सापेगाव), सचिन बाळकृष्ण वाघमारे (वय २३), सत्यवान बाळकृष्ण वाघमारे (वय २१), नितीन बाळकृष्ण वाघमारे (वय २०, तिघे रा. चोचिंदे, ता. महाड) या रायगड जिल्ह्यातील सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हातनूर परिसरात ऊसतोड करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची टोळी दाखल झाली आहे. ही टोळी शिकार करत असल्याचा संशय गावातील लोकांना आठ दिवसांपूर्वीच आला होता. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. शनिवार रात्री अजित सोनटक्के यांच्या शेतात झाडावर बॅटरीचा उजेड दिसला. तेव्हा रात्री दहा वाजता सचिन पाटील, उत्तम पाटील, शिवम पाटील, अजित सोनटक्के, बाळासाहेब पाटील यांच्यासह २५ हून अधिक शेतकरी व ग्रामस्थांनी टोळीला घेरून ताब्यात घेतले. टोळीने दोन मोरांची शिकार केल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी तासगाव पोलिस आणि वन विभागाशी संपर्क साधून मध्यरात्री १२ वाजता त्यांना बोलावून घेतले.
वनविभागाच्या पथकाने सहा जणांना ताब्यात घेतले. रविवारी दुपारी सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल कल्पना पाटील, सागर पताडे, ओंकार शेळके, दीपाली सागावकर, सुनील पवार आदींचे पथक पंचनाम्यासाठी हातनूर येथे संशयितांना घेऊन आले होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या ठिकाणी त्यांना मोराची पिसे, लगोर, बॅटरी आदी शिकारीसाठीचे साहित्य जप्त केले.