सांगलीजवळ भीषण अपघात, जीपचे हुड एकीकडे तर खालचा भाग दुसरीकडे; दोघे ठार
By शरद जाधव | Updated: September 8, 2022 17:11 IST2022-09-08T17:08:01+5:302022-09-08T17:11:27+5:30
जीपमधील अन्य सहाजण गंभीर जखमी

सांगलीजवळ भीषण अपघात, जीपचे हुड एकीकडे तर खालचा भाग दुसरीकडे; दोघे ठार
सांगली : नांद्रे (ता.मिरज) येथे चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात खटाव (ता. पलूस)मधील दोन तरुण ठार झाले. जीपमध्ये असलेले अन्य सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, जीपचे हुड एका बाजूला तर जीपचा खालचा भाग दुसऱ्या बाजूला पडला होता.
याबाबत माहिती अशी की, खटाव (ता.पलूस) येथील आठ तरुण जीपमधून सांगलीत आले होते. गुरुवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास ते परत जात होते. भरधाव असलेल्या जीपवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती गावातील दर्गाहसमोर असलेल्या एका घराच्या खांबाला जाऊन धडकली.
हा खांब वाकवत जीप फरफटत पुढे गेली. यात जीपचा टप निघून पडला तर खालचा भाग दुसरीकडे जावून पडला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तरुणांना उपचारासाठी सांगलीला हलवले. सांगली ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी भेट देत पंचनामा केला.