बिऊर येथे अडीच लाखांची घरफोडी
By Admin | Updated: January 29, 2015 00:13 IST2015-01-28T22:53:24+5:302015-01-29T00:13:59+5:30
भरदिवसा घटना : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकम लंपास

बिऊर येथे अडीच लाखांची घरफोडी
कोकरुड : बिऊर (ता. शिराळा) येथील पाण्याच्या टाकीजवळ हंबीरराव नाईक पतसंस्थेच्या इमारतीमध्ये रहात असलेल्या शामराव शंकर जाधव यांच्या राहत्या खोलीतील अडीच लाखांचे ८ तोळे सोने व रोख सात हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली.
बिऊर गावच्या पश्चिम बाजूस पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ हंबीरराव नाईक पतसंस्थेची इमारत आहे. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब जाधव यांचे बंधू शामराव हे जुन्या घराची दुरुस्ती चालू असल्याने संस्थेच्या इमारतीमध्ये असणाऱ्या खोलीत आपल्या कुटुंबासह जवळपास एक वर्षापासून रहात आहेत. शामराव हे विश्वास सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरीस आहेत. पत्नी घरकाम करते. मुलगी वैष्णवी व मुलगा विश्वजित शाळेत जातात. नेहमीप्रमाणे आज शामराव कामावर गेले. तसेच दोन्ही मुले शाळेत गेली होती. पत्नी पूजा कामे आटोपून बारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या शेतात गेल्या होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पूजा परत आल्या असता घराचा व पतसंस्थेचा दरवाजा उघडाच होता. मुले शाळेतून आली असतील म्हणून त्यांनी मुलांना हाका मारल्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्या घरी गेल्या. घरात असलेले कपाट उघडलेले दिसले व त्यातील साहित्य विस्कटलेले दिसून आले. गौरी-गणपतीसाठी आणलेले बेंटेक्सचे दागिने पलंगावर ठेवलेले दिसले. घरात चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पती शामराव यांना बोलावून घेतले. शामराव यांनी शिराळा पोलिसांत माहिती दिली.
शेजारी असणाऱ्या पतसंस्थेचेही कुलूप काढून संस्थेच्या कपाटातील साहित्य विस्कटलेले आढळून आले. परंतु त्याठिकाणी पैसे नसल्याने संस्थेची कागदपत्रे विस्कटून टाकली होती. शामराव यांच्या गोदरेजच्या कपाटातील पाटल्या, मंगळसूत्र, अंगठी, चेन, कर्णफुले व इतर दागिने असे आठ तोळे सोने व रोख सात हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल मिसाळ करीत आहेत. (वार्ताहर)