बलात्कार करून खून प्रकरणी अल्पवयीन मुलास बारा वर्षे शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 05:40 IST2021-05-07T05:40:07+5:302021-05-07T05:40:55+5:30
गेल्या वर्षी तुंगमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याची वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण झाली आहे.

बलात्कार करून खून प्रकरणी अल्पवयीन मुलास बारा वर्षे शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तुंग (ता. मिरज) येथे अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवीत तिच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला जिल्हा न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दरम्यान, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम नवीन कायदा दुरुस्तीनुसार चाललेला राज्यातील पहिला गुन्हा, तर शिक्षा झालेली देशातील पहिलीच घटना ठरली आहे.
गेल्या वर्षी तुंगमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याची वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण झाली आहे. तुंगजवळील एका भागातील अल्पवयीन मुलगी २० मे २०२० रोजी सायंकाळी सातपासून बेपत्ता झाली होती. रात्रभर शोध घेऊनही ती सापडली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा शोध सुरू करण्यात आला होता. हाळभाग परिसरात एका शेतात तिचा मृतदेह सापडला होता.
या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन आरोपीने पीडित मुलीला उसाच्या शेतात नेऊन मोबाईलवर तिला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर मुलगी रडू लागल्याने तिला खाली पाडून संशयिताने तिचा गळा आवळून खून केला होता. न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे, दंड न भरल्यास तीन वर्षे व बालन्याय अधिनियमानुसार तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
कायदा दुरुस्तीनंतर पहिलाच निकाल
गुन्हा घडला यावेळी आरोपीचे वय १६ वर्षे आठ महिने होते. आरोपी अज्ञान असल्याने बाल न्याय अधिनियमाच्या कायद्यातील दुरुस्तीनुसार गुन्हा क्रूरतेचा असल्याने विशेष न्यायालयात चालला. नवीन कायदा दुरुस्तीनुसार राज्यातील पहिलाच हा गुन्हा चालला; तर आरोपीस शिक्षा झालेली संपूर्ण देशातील ही पहिलीच घटना ठरली.