Sangli: ताकारी पुलावरून ट्रक कोसळला, चालक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:39 IST2024-12-13T13:37:22+5:302024-12-13T13:39:56+5:30
विरूद्ध बाजूने येणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरला वाचवताना पुलाचा कटडा तोडून ट्रक तब्बल ५५ फुट खोल नदी पात्राच्या कडेला कोसळला

Sangli: ताकारी पुलावरून ट्रक कोसळला, चालक जखमी
बोरगाव: ताकारी ता. वाळवा येथील राजारामबापू पुलावरून औषध निर्मितीचा कच्चा माल वाहतूक करणारा ट्रक तब्बल ५५ फूट खाली नदी पात्राच्या कडेला कोसळला. यात चालक बाळासाहेब गुलाबराव देवकर (वय ५५ रा. कुपवाड) हे गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री १२.४० च्या सुमारास घडली. जखमी चालकाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळासाहेब दरेकर हे सांगली येथून फार्मा कंपनीचे औषध निर्मितीचा कच्चा माल मुंबईकडे घेऊन निघाले होते. ताकारीच्या राजारामबापू पुलावर आले असता समोरून ऊसाचा ट्रॅक्टर भरधाव वेगाने विरूद्ध बाजूने येत होता. ट्रॅक्टरला वाचवताना अंधारात पुलाचा अंदाज न आल्याने पुलाचा कटडा तोडून ट्रक तब्बल ५५ फुट खोल नदी पात्राच्या कडेला कोसळला. यात ट्रक चालक दरेकर गंभीर जखमी झाले. गावातील तरूणांनी त्यांना सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरेकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ट्रक मालक जयदत्त शिंदे यांनी दिली. अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.
दैव बलवत्तर
ट्रक तब्बल ५५ फूट नदी पात्राच्या कडेला लाल मातीत कोसळल्याने चालकाचा जीव वाचला. दहा फुट मागील बाजूस नदी पात्रात ट्रक कोसळला असता तर चालकाला जीव गमवावा लागला असता. मध्यरात्री नागरिक व तरूणांनी मदत करून तात्काळ चालकाला रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला.