सांगलीतील दंडोबा परिसराची पर्यटकांना भुरळ, डोंगरावर हिरवाई पसरल्याने मोठी वर्दळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 13:34 IST2022-11-22T13:34:28+5:302022-11-22T13:34:52+5:30
दिवसेंदिवस दंडोबा डोंगराचे महत्व वाढत चालले असून ट्रॅकिंग, भ्रमंती पर्यटनाचा आनंद घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणून आता नवी ओळख.

सांगलीतील दंडोबा परिसराची पर्यटकांना भुरळ, डोंगरावर हिरवाई पसरल्याने मोठी वर्दळ
महेश देसाई
शिरढोण : जिल्ह्यात सर्वत्र ख्याती असलेला, एक दिवसाचा पिकनिक स्पॉट म्हणून पर्यटकांना नेहमी खुणावत असलेला मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवरील दंडोबा डोंगराने हिरवाईचा शालू नेसला आहे. डोंगरावर हिरवाई पसरल्याने पर्यटकांची वर्दळ सुरु झाली आहे. ट्रेकिंग, पर्यटनासाठी सर्वांना भुरळ घालणारा दंडोबा डोंगर पर्यटकांचे मनमोहक करत लक्ष वेधत आहे.
पाच ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या दंडोबा डोंगर ११५० हेक्टरवर पसरला आहे. डोंगरावर अनेक विविध पक्षी, प्राणी आढळतात. डोंगरावर दंडनाथाचे मंदिर असून परिसरासह जिल्ह्यात जागृत देवस्थान आहे. डोंगरावर गुप्तलिंग, केदारलिंग, शिखर आहे. डोंगरावर जाण्यासाठी पूर्णतः पक्का रस्ता आहे. ऐतिहासिक म्हणून असलेल्या डोंगरावर सुमारे दोनशे वर्षापूर्वी होऊन अधिक काळ असलेले शिखर ही दंडोबाची ओळख आहे. दंडनाथाच्या मंदिरात प्राचीन गुफा आहे. विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या दंडोबावर ट्रेकिंग करण्यासाठी संधी असून अनेक वेळा ट्रेकिंग याठिकाणी केली जाते.
कसे जाल
- सांगली ते खरशिंग फाटा ते दंडोबा
- डोंगर - ४० किमी (रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग)
- मिरज ते खरशिंग फाटा ते दंडोबा डोंगर - ३० किमी (रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग)
- कवठेमहांकाळ ते खरशिंग ते दंडोबा डोंगर - १८ किमी
चित्रीकरण स्पॉट
डोंगरावर काही मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. अनेकवेळा जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक नेते श्रावणात डोंगरावरील दंडोबाला भेट देत असतात. दिवसेंदिवस दंडोबा डोंगराचे महत्व वाढत चालली असून ट्रॅकिंग, भ्रमंती पर्यटनाचा आनंद घेण्याचे एकमेव ठिकाण म्हणून आता डोंगराची नवी ओळख आहे.